राज्यापेक्षा देश मोठा असल्याचे सूचक वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गुरुवारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देतील ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोहर पर्रिकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश केला जाणार असून, त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे संरक्षणमंत्रीपद दिले जाणार असल्याचे वृत्त सर्वच माध्यमांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी सूचक वक्तव्य केले. पर्रिकर यांनी बुधवारी संध्याकाळी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच मंत्रिमंडळात त्यांचा समावेश केला जाणार, हे स्पष्ट झाले होते. येत्या रविवारी किंवा सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून, त्यावेळी पर्रिकर यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
पर्रिकर केंद्रात गेल्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करायची, यावर निर्णय घेण्यासाठी भाजपमध्ये बैठकांना सुरुवात झाली आहे. गोव्यातील सध्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र अर्लेकर यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पार्सेकर आणि अर्लेकर हे दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत.