Omicron: दक्षिण आफ्रिकेत लॉकडाउनचं संकट, विमानतळांवर गोंधळाचं वातावरण; अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती

दक्षिण आफ्रिकेत करोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत

Covid 19, Omicron, guidelines for international travellers, Omicron news, Omicron cases news,
दक्षिण आफ्रिकेत करोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. यामुळे दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवेवर परिणाम झाला असून कडक लॉकडाउनची भीती सतावत आहे. दक्षिण आफ्रिकेतील विमानांवर बंदी घालण्यात आल्याने विमानतळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.

दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी गुरुवारी करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणू ओमिक्रॉनचा शोध लागल्याचं जाहीर केलं. यानंतर धास्तावलेल्या देशांनी येथून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली. यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमधील काही देशांचा समावेश आहे.

aljazeera च्या वृत्तामुसार, दक्षिण आफ्रिकेतील सर्वात व्यस्त विमानतळ OR Tambo वर अडकलेले स्टीव्ह लॉरेन्स यांनी, हा खूप मोठा गोंधळ असून कोणीही आम्हाला सध्या प्रवासाची काय स्थिती आहे याबद्दल सांगत नसल्याचं म्हटलं आहे. “प्रत्येक मिनिटाला गोष्टी बदलत असून आम्ही हतबल स्थितीत आहोत. आम्ही डिसेंबर महिन्यात अमेरिकेत राहण्याचं ठरवलं होतं, पण आता आम्ही अडकलो आहेत,” असं ते म्हणाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेत करोनाचे रुग्ण नोव्हेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दरम्यान देशांनी निर्बंध घातल्याने दक्षिण आफ्रिका सरकार आणि तेथील नागरिकांनी नाराजी जाहीर केली आहे. लसशास्त्रज्ञ शबीर यांनी सांगितल्यानुसार, “दक्षिण आफ्रिकेसारख्या देशावर पूर्ण बंदी घालून करोनाच्या नव्या विषाणूला आपण रोखू शकतं असा विचार विकसित देशांनी करणं मूर्खपणाचं आहे. दक्षिण आफ्रिकेत प्रवास न कऱणाऱ्या किंवा संपर्कात न आलेल्यांनाही लागण होत असून नव्या विषाणूने आधीच आपला मार्ग शोधला आहे”.

“दक्षिण आफ्रिकेत नव्या विषाणूचा शोध लागला याचा अर्थ तो येथील विषाणू आहे असा होत नाही. करोनाच्या नव्या विषाणूचा शोध लावण्यात आम्ही यशस्वी झालो ही आमची चूक आहे का?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.

दरम्यान विमानसेवा ठप्प होत असल्याने पर्यटनालाही मोठा फटका बसत असून कोट्यवधींचं नुकसान होण्याची भीती आहे. २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेला १० बिलियन डॉलर्सचं नुकसान सहन करावं लागलं होतं.

कडक निर्बंध लावण्याची तयारी

दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा कठोर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांची रविवारी तज्ज्ञांसोबत बैठक होणार असून यानंतर ते देशाला संबोधित करणार आहेत. याआधी दक्षिण आफ्रिकेत जगातील सर्वात कडक लॉकडाउन लावण्यात आला होता. प्रवासबंदीसोबत त्यांनी मद्य आणि सिगारेटच्या विक्रीवरही बंदी आणली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covid 19 omicron variant scare chaos in south africa after flights grounded sgy

ताज्या बातम्या