देशातील करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, करोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र अद्यापही करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्या अद्याप कमी झालेली नाही. अशातही काल दिवसभरात ७२ दिवसांमधल्या सर्वात कमी करोना बाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात देशभरात ७० हजार ४२१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून,१ लाख १९ हजार ५०१ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ३ हजार ९२१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार देशात सलग सातव्या दिवशी १ लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १० लाखांपेक्षा कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात ७०,४२१ नवीन करोनाचे रुग्ण आढळले आणि ३९२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर १ लाख १९ हजार ५०१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. म्हणजेच, आठवड्याच्या शेवटी ५३,००१ सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी ३० मार्च  रोजी ५३,४८० रुग्णांची नोंद झाली होती.

Maharashtra Lockdown:…तर राज्यात पुन्हा नव्याने निर्बंध; ठाकरे सरकारचा इशारा

नविन करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

सलग ३२ व्या दिवशी देशात नविन करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.१३ जूनपर्यंत देशभरात २५ कोटी ४८ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. रविवारी १४ लाख ९९ हजार लसीं देण्यात आल्या. त्याचबरोबर आतापर्यंत सुमारे ३८ कोटी करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा >> Children orphaned in pandemic : करोनामुळे देशात ३,६२१ बालके अनाथ

तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त रुग्ण

तमिळनाडूमध्ये गेल्या २४ तासांत १४,०१६ नविन रुग्ण आढळून आले आहेत. तर २६७ रुग्णांच्या मृत्यूसह एकूण मृतांची संख्या २९,५४७ झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात रविवारी १०,४४२ नवे बाधित आढळून आले आणि ४८३ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात एकूण मृतांची संख्या १ लाख ११ हजार १०४ झाली आहे. देशभरातील मृत्यूंपैकी दिवसभरात सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. तर दिल्लीमध्ये २५५ नव्या रुग्णांसह २३ जणांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत देशात एकूण २ कोटी ९५ लाख १० हजार ४१० नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. तर २ कोटी ८१ लाख ६२ हजार ९४७ जणांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्या ९ लाख ७३ हजार १५८ सक्रिय रुग्ण आहेत. तर देशभरात आतापर्यंत ३ लाख ७४ हजार ३०५ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे.