आज करोना व्हायरसने विज्ञानासमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. या आजारामुळे सर्वांचीच जीवन जगण्याची पद्धतच बदलून गेली आहे. जीव वाचवण्याबरोबरच या, करोना व्हायरसने अनेक गंभीर आर्थिक प्रश्न निर्माण केले आहेत. त्यामुळे काहीही करुन या करोना व्हायसरवर परिणामकारक ठरणारी लस शोधून काढण्यासाठी जगातल्या प्रमुख देशांमध्ये मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. सध्या शास्त्रज्ञांची एकप्रकारे वेळेबरोबर लढाई सुरु आहे. कारण करोनावर लस निर्मितीसाठी जितका जास्त वेळ लागेल, तितके नुकसान अधिक आहे. कारण लॉकडाउनमुळे संपूर्ण अर्थचक्र ठप्प झाले आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

जगात ४२ लाखपेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. अमेरिकेतील मोडर्ना, नोव्हाव्हॅक्स या कंपन्या Covid-19 वर लस बनवत असून त्यामध्ये बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. Covid-19 वर लस संशोधन करणाऱ्या मोडर्ना थेराप्युटीक्सला अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासन FDA कडून जलदगतीने आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. नोव्हाव्हॅक्स लवकरच लसीच्या मानवी चाचण्या सुरु करणार आहे. सध्याच्या घडीला Covid-19 ची लस सर्वांसाठीच महत्वाची आहे. जगात जवळपास १०० संशोधकांचे गट करोनाला रोखणारी लस शोधून काढण्यासाठी संशोधन करत आहेत. संशोधन ते क्लिनिकल चाचण्या अशा वेगवेगळया टप्प्यांवर हे लस प्रकल्प आहेत.

“करोनावर विकसित करत असलेल्या लसी संदर्भात आम्हाला अमेरिकन FDA कडून जलदगतीने परवानग्या मिळाल्या आणि लवकरच फेज २ च्या चाचण्या सुरु करणार आहोत” असे मोडर्ना थेराप्युटीक्सकडून सांगण्यात आल्याचे वृत्त यूएसए टुडेने दिले आहे. ही अमेरिकन बायोटेक्नोलॉजी कंपनी आहे. दुसऱ्या टप्प्यात मोडर्ना ६०० तंदुरुस्त स्वयंसेवकांवर mRNA-1273 लसीची चाचणी करणार आहे. ६०० स्वयंसेवकांपैकी निम्मे १८ ते ५५ वयोगटातील तर उर्वरित ५५ च्या पुढच्या वयोगटातील असतील. mRNA-1273 लसीद्वारे करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यात येईल. मोडर्ना थेराप्युटीक्स करोना व्हायरसला निष्प्रभ करण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी लस विकसित करत आहे.

नोव्हाव्हॅक्स ही दुसरी अमेरिकन कंपनी करोना व्हायरसविरोधात लस विकसित करत आहे. नोव्हाव्हॅक्स लवकरच NVX-COV2373 लसीच्या मानवी चाचण्या सुरु करणार आहे. या कंपनीला लस संशोधनासाठी डॉलरच्या स्वरुपात मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नोव्हाव्हॅक्सने आधी प्राण्यांवर लसीची चाचणी घेतली. त्यात आश्वासक, चांगले रिझल्टस मिळाले आहेत. पुढच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियात १३० जणांवर मानवी चाचणी करण्यात येणार आहे. उंदीर आणि माकडांवर करण्यात आलेली लस चाचणी खूपच आश्वासक ठरली आहे असे डॉक्टर ग्रीगोरी ग्लेन यांनी सांगितले. ते नोव्हाव्हॅक्सचे संशोधन आणि विकास विभागाचे अध्यक्ष आहेत. नोव्हाव्हॅक्सने मॅट्रीक्स-एम टेक्नोलॉजीने ही लस विकसित केली आहे. मोडर्नाच्या लसीप्रमाणे ही लस सुद्धा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबर अ‍ॅंटीबॉडीजना निष्प्रभावी करेल.

मोडर्ना, नोव्हाव्हॅक्स प्रमाणे सानोफी ही फ्रेंच कंपनी सुद्धा करोना व्हायरसला निष्प्रभावी करणारी लस विकसित करत आहे. अलीकडेच या कंपनीने लस बनवल्यानंतर सर्वप्रथम अमेरिकेला उपलब्ध करुन दिली जाईल असे म्हटले होते. त्यावरुन मोठा वाद झाला होता. “अमेरिकेने आमच्या लस संशोधनात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचा हक्क आहे” असे सानोफीचे सीईओ पॉल हडसन ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. त्यावरुन मोठा वाद झाला. आता या कंपनीने जगातील सर्व देशांना लस उपलब्ध करुन देऊ असे म्हटले आहे. तापावर ज्या पद्धतीने लस विकसित केली. तीच टेक्नोलॉजीवापरुन सानोफी करोना व्हायरसवर लस बनवत आहे.

Covid-19 विरोधात लस बनवण्यासाठी इस्रायलमधील तेल अविव विद्यापीठाने एका स्विस बायो फार्मा कंपनीसोबत सोबत भागीदारी केली आहे. जेरुसलेम पोस्टने हे वृत्त दिले आहे. दुसऱ्या व्हॅक्सीनपेक्षा जास्त प्रभावी आणि सुरक्षित व्हॅक्सीन बनवण्याचा आमचा उद्देश आहे असे जोनाथन गेरशोनी यांनी सांगितले. ते तेल अविव विद्यापीठातील मॉलीक्युलर सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नोलॉजी विभागाचे प्राध्यापक आहेत. संपूर्ण प्रोटीन स्पाइकला नव्हे तर शरीरातील पेशीवर हल्ला करणाऱ्या व्हायरसच्या विशिष्ट भागाला लक्ष्य करणारी लस बनवण्याच्या दृष्टीने इस्रायलचे संशोधन सुरु आहे. यामुळे आपल्या इम्युन सिस्टिमची म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीची भरपूर ऊर्जा वाचू शकते असे गेरशोनी यांनी म्हटल्याचे वृत्त जेरुसलेम पोस्टने दिले आहे.