लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदानाला आता काही दिवस उरले असतानाच वादग्रस्त विधानांचे प्रमाण वाढले आहे. सीपीआय (एम) या पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. हिंदू हिंसक नसल्याचा दावा खरा आहे का, असा प्रश्न विचारत येचुरी यांनी थेट रामायण आणि महाभारताचा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे.

सीताराम येचुरी हे गुरुवारी मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे एका कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात येचुरी यांनी हिंदू धर्माविषयी भाष्य करताना थेट रामायण आणि महाभारताचा दाखला दिला. येचुरी म्हणाले, रामायण आणि महाभारतात हिंसक घटना आणि युद्धाचा उल्लेख आहे. संघाचे प्रचारक म्हणून ही बाजू सांगितलीच जात नाही, रामायण आणि महाभारत हे महाकाव्य असल्याचे सांगितले जाते. रामायण आणि महाभारताचे दाखले दिल्यानंतरही हिंदू हिंसक नसल्याचा दावा केला जातो. एका विशिष्ट धर्माची लोकंच हिंसा करतात, हिंदू हिंसा करत नाही हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. रामायण-महाभारतातही हिंसा आहे, मग हिंदू हिंसक नसतात हे कसं सांगणार, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये देशात लूटमार करणाऱ्यांचे राज्य आहे. अनेक उद्योगपती आणि व्यापारी बँकांना गंडा घालून पळाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील तीन टप्प्यानंतर भाजपाला पराभवाचे संकेत मिळू लागले आहेत. या भीतीपोटीच भाजपाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. प्रज्ञा यांना रिंगणात उतरवून भाजपा मूळ मुद्द्यांवरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही येचुरी यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात काँग्रेस नेते आणि भोपाळमधील उमेदवार दिग्विजय सिंह हे देखील उपस्थित होते. नरेंद्र मोदी हे पुढील पंतप्रधान नसतील, २०१९ मधील निवडणूक ही विचारधारेची लढाई आहे, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.