छत्तीसगड येथील दंतेवाडा जिल्ह्य़ात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सीआरपीएफ’) छावणीत एका सहकाऱ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात चार जवान ठार तर अन्य एकजण जखमी झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
‘सीआरपीएफ’च्या १११ बटालियनच्या छावणीत सोमवारी रात्री आपले सहकारी गाढ झोपले असल्याचे पाहून दीप कुमार तिवारी याने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला, असे दंतेवाडाचे पोलीस महानिरीक्षक नरेंद्र खरे यांनी सांगितले. या हल्ल्यात तीन जवान जागीच ठार झाले तर अन्य एकजण रुग्णालयात मरण पावला. या हल्ल्याचे खरे कारण समजू शकलेले नाही. मात्र तिवारी हा मनोरुग्ण होता व त्याने दबावापोटी हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.