वरदा या चक्रीवादळाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईच्या किनारपट्टीवर हायलअर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळाचे स्वरूप अत्यंत तीव्र असेल, अशी शक्यता भारतीय हवामान खात्याचे संचालक एस. भालचंद्रन यांनी वर्तविली आहे. आज दुपारपर्यंत तब्बल १८० किलोमीटर वेगाने हे वादळ चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडू व आंध्र प्रदेशमध्ये सुरक्षेच्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तामिळनाडूत गेल्या दहा दिवसांपासून विक्रमी पाऊस कोसळत असल्यामुळे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या ३६ तासात किनारपट्टीच्या परिसरातील अनेक ठिकाणी अशाचप्रकारचा पाऊस कोसळेल, अशी शक्यता एस. भालचंद्रन यांनी वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच मच्छिमारांना ३० नोव्हेंबरपासूनच समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. वरदा या चक्रीवादळाचे उगमस्थान दक्षिण थायलंडमध्ये असून त्याठिकाणी या वादळाने १२ बळी घेतले आहेत. यापूर्वी, अंदमान व निकोबार बेटांवर अचानक झालेल्या हवामान बदलांमुळे अनेक पर्यटक अडकून पडले होते. मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळसदृश्य परिस्थिती यामुळे अंदमानमधील नील आणि हावेलॉक बेटावर अडकलेल्या सर्व २,३६७ पर्यटकांची भारतीय हवाई दल आणि नौदलाने सुखरुप सुटका केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील ५० हून अधिक पर्यटकांचाही समावेश होता.

दरम्यान, वरदा चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकानेही (एनडीआरएफ) विशेष तयारी केली आहे. एनडीआरएफकडून चेन्नई किनारपट्टीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले असून कोणतीही आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास बचाव पथके सज्ज असल्याची माहिती एनडीआरएफचे डीजी आरके पंचनंदा यांनी दिली.