पीटीआय, नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘भारतीय चित्रपट क्षेत्रात मानाचा सर्वोच्च पुरस्कार’ अशी ओळख असलेल्या या पुरस्काराची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी केली. शुक्रवारी होणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळय़ात ७९ वर्षीय आशा पारेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

आशा भोसले, हेमा मालिनी, पुनम धिल्लों, उदित नारायण, टी. एस. नागभरण या पाच मान्यवरांच्या समितीने पारेख यांची या पुरस्कारासाठी निवड केली. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर या आपल्या मतदारसंघात पत्रकारांशी बोलताना ठाकूर यांनी सांगितले, की निवड समितीने ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. माहिती प्रसारण मंत्रालयाला या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा करताना अभिमान वाटतो.

वयाच्या दहाव्या वर्षांपासून आशा पारेख यांनी आपल्या कारकीर्दीस प्रारंभ केला. सुमारे पन्नास वर्षे अभिनय क्षेत्रातील त्यांची कारकीर्द गाजली. ९५ पेक्षा जास्त चित्रपटांत त्यांनी काम केले. यापैकी ‘दिल देके देखो’, ‘कटी पतंग’, ‘तिसरी मंजिल’, ‘बहारों के सपने’, ‘प्यार का मौसम’, ‘कारवाँ’ अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. हिंदी चित्रपटातील प्रभावी अभिनेत्रींपैकी एक अशी ओळख त्यांनी निर्माण केली. कृष्ण-धवल चित्रपटांपासून रंगीत चित्रपटांपर्यंतचा दीर्घ काळ त्यांनी गाजवला. १९९२ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. २०१९ चा फाळके पुरस्कार रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला होता.

‘द हिट गर्ल’

१९५२ मध्ये ‘आसमाँ’ या चित्रपटात बाल कलाकार म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर दोन वर्षांनी बिमल रॉय यांच्या ‘बाप-बेटी’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केली. मात्र, नायिका म्हणून त्यांच्या कारकीर्दीस नासीर हुसेन यांच्या १९५९ च्या ‘दिल देके देखो’ या चित्रपटाने प्रारंभ झाला. अभिनेते शम्मी कपूर हे या चित्रपटात नायक होते. १९९० च्या अखेरीस आशा पारेख यांनी निर्मात्या व दिग्दर्शक म्हणूनही कारकीर्द गाजवली. ‘कोरा कागज’ ही त्यांनी निर्मित-दिग्दर्शित केलेली दूरचित्रवाणी मालिका गाजली होती. २०१७ मध्ये प्रसिद्ध चित्रपट समीक्षक खालिद मोहम्मद यांच्यासह सहलेखन केलेले त्यांचे ‘द हिट गर्ल’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते.