राजस्थान रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष व १९७८ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी उमराव सलोदिया यांनी हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्मात प्रवेश केला, त्यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्जही केला आहे. सरकारने सध्याचे मुख्य सचिव सी.एस.राजन यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देताना आपल्याकडे दुर्लक्ष केले व पक्षपात केला असा आरोप त्यांनी केला आहे. राजस्थानमध्ये भाजपचे सरकार आहे.
सलोदिया यांनी पत्रकार परिषदेत एक पत्र सादर केले त्यात असे म्हटले आहे, की भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ (१) अन्वये प्रत्येक नागरिकाला व्यवसायाचे, धर्म प्रसाराचे स्वातंत्र्य दिले आहे, त्यानुसार आपण ३१ डिसेंबर २०१५ रोजी इस्लाम धर्म स्वीकारला आहे.
सलोदिया यांनी पत्रकारांच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. अनुसूचित जाती जमातीचा सदस्य असल्याने मला वरिष्ठ आयएएस अधिकारी असतानाही मुख्य सचिवाची जबाबदारी दिली नाही हा पक्षपात आहे. राजन यांना मात्र मुख्य सचिवपदावर तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. आता मी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला आहे.
संसदीय कामकाज व आरोग्यमंत्री राजेंद्र राठोड यांनी सलोदिया यांचे आरोप फेटाळताना सांगितले, की त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्याबाबत पक्षपात केलेला नाही, त्यांचे आरोप निराधार आहेत व प्रसिद्धी मिळवण्याचा त्यात हेतू आहे. कुठलाही धर्म स्वीकारायला त्यांना स्वातंत्र्य आहे.