अमेरिकेतील कृष्णवर्णीयांवर पोलिसांकडून होणाऱया हल्ल्याविरुद्ध डलास येथे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले. निदर्शनावेळी आंदोलकांपैकी काही बंदुकधाऱयांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. यात चार पोलीस जागीच ठार झाले, सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये प्रकृती गंभीर असलेल्या एका पोलीसाचा देखील मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. एकूण चौघांना अटक करण्यात आली आहे.
मिनेसोटामध्ये फिलांदो कास्टिले(३२) या तरुणावर पोलिसांनी गोळीबार केला होता. गोळीबारात जखमी झालेल्या कास्टिले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर कृष्णवर्णींमध्ये पोलिसांविरोधात असंतोष पसरला. त्यानंतर दुसऱयाचा दिवशी अल्टॉन स्टर्लिंग(३७) या कृष्णवर्णीला पोलिसांनी ठार केले. सलग दोन दिवस पोलिसांकडून कृष्णवर्णीय तरुणांवर गोळीबार केल्याच्या या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी. सर्व कृष्णवर्णीयांनी एकत्र येऊन डलास शहरात आंदोलन पुकारले होते. मात्र, गुरूवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. आंदोलकांपैकी काहींनी दहा पोलिसांच्या समावेश असलेल्या एका तुकडीवर अंदाधुंद गोळीबार केला आणि या गोळीबारात चार पोलीस अधिकाऱयांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, काही संशयितांची छायाचित्रे देखील जारी केली आहेत.