‘रिंगलिंग ब्रदर्स अँड बार्नुम बेली’ हे नाव एेकलं की पहिल्यांदा काहीच पत्ता लागत नाही. पण ‘वाघ, सिंह माझे सखे-सोबती’ असं म्हटल्यावर बालभारतीतला तो धडा अंधुकसा आठवतो. ‘सोनिया’ वाघिणीच्या पिंजऱ्यात शिरून जगप्रसिध्द पशुशिक्षक दामू धोत्रे यांनी सर्कसच्या तंबूमध्ये काबूत आणलेल्या स्थितीबद्दलची ती कथा आठवली की संदर्भ लक्षात येतो.

दामू धोत्रे १९३० आणि १९४०च्या दशकात जगातले अव्वल पशुशिक्षक मानले जायचे. जगप्रसिध्द फ्रेंच रिंगमास्टर आल्फ्रेड कोर्ट यांच्या तोडीस तोड म्हणून धोत्रेंचं नाव घेतलं जायचं.

 

'दामू धोत्रे आॅफ इंडिया' या नावाने जगभर प्रसिध्द
‘दामू धोत्रे आॅफ इंडिया’ या नावाने जगभर प्रसिध्द

 

दामू धोत्रेंनी ज्या सर्कसमध्ये काम करत प्रचंड जागतिक प्रसिध्दी मिळवली ती रिंगलिंग ब्रदर्स अँड बार्नुम बेली सर्कस गेली १४६ वर्ष जगभर चालते आहे. टेलिव्हिजनचा जमाना येण्याआधी जगातल्या या सर्वात मोठ्या सर्कशीचा दबदबा आजच्या बलाढ्य मीडियासमूहांसारखा होता. गेलं दीड शतक जगभरातल्या प्रेक्षकांना रिझवणारा एकेकाळचा जगातला सर्वात मोठा शो आता कायमचा बंद होणार आहे. यावर्षी २१ मे ला या सर्कसचा शेवटचा प्रयोग न्यूयाॅर्कमध्ये होणार आहे. प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी, टीव्ही, इंटरनेट, कायदेशीर कटकटी यांना तोंड देत इथवर आलेल्या रिंगलिंग ब्रदर्सचा डोलारा सावरणं आता दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. त्यातही या लुप्त होत जाणाऱ्या कलाप्रकाराशी इमान राखायचं या एकाच उद्देशाने शो चालू ठेवणाऱ्या रिंगलिंग ब्रदर्सनाही आता आर्थिक तसंच कायदेशीर बाबींमुळे सर्कस सुरू ठेवण शक्य होत नाहीये. ही सर्कस बंद झाल्यावर एका युगाचा अंत होणार आहे.

१४६ वर्षांच्या सर्कशीचा शेवटचा शो २१ मे ला
१४६ वर्षांच्या सर्कशीचा शेवटचा शो २१ मे ला

 

सर्कशीत प्राण्यांचा छळ होतो असा आरोप होतो आणि तो खराही आहे. पण अत्यंत व्यावसायिकपणे या क्षेत्रात असणाऱ्या रिंगलिंग ब्रदर्सनी प्राण्यांच्या काळजीकडे नेहमीच विशेष लक्ष दिलं. हत्तींचे खेळ हे या सर्कसचं वैशिष्ट्य होतं. पण वन्य प्राण्यांविषयी दिवसेंदिवस कडक होत जाणाऱ्या कायद्यांना या सर्कसला नेहमी तोंड द्यावं लागलं. काही वर्षांपूर्वी अमेरिकन कोर्टाने सर्कसला हत्तींचे खेळ थांबवायला सांगितलं आणि तिकिटबारीवर मोठी मंदी आली. रिंगलिंग ब्रदर्सने यातूनही मार्ग काढायचा प्रयत्न केला पण शेवटी आर्थिक गणितं योग्य न जमल्याने ही सर्कस आता बंद होणार आहेत. आजही या सर्कसमध्ये ५०० कलाकार काम करत आहेत. तर वाघ, सिंह, उंट यांसारखे अनेक प्राणीही या सर्कशीच्या मालकीचे आहेत. या प्राण्यांना २१ मे नंतर मुक्त केलं जाणार आहे.

दामू धोत्रे हे नाव सगळ्यांच्या हळूहळू विस्मरणात जायला लागलेलं असलं आणि पुण्यामध्ये जन्म झालेला या नावाचा माणूस परदेशात प्रचंड कीर्ती मिळवत होता यावर कुणाचा पटकन विश्वास बसत नसला तरी धोत्रे युरोप आणि अमेरिकेत मोठे सेलेब्रिटी होते. त्याकाळचे रिंगमास्टर्स वाघ-सिंहांच्या पिंजऱ्यात शिरताना त्यांचे पंजे आणि दातांपासून स्वत:चा बचाव व्हावा असे संरक्षक कपडे घालून जायचे. पण दामू धोत्रेंना त्यांनी प्रशिक्षण दिलेल्या या हिंस्त्र जनावरांवर एवढा विश्वास होता की फोटोत दाखवलेला वेश घालून चाबूकही न घेता कुठल्याही संरक्षणाशिवाय ते प्राण्यांचे खेळ करायचे. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात त्यांनी अमेरिकन सैन्यातर्फे युध्दात भागही घेतला होता. अमेरिकेत त्यांची लोकप्रियता एवढी अफाट होती की युध्दाच्या काळात अमेरिकन जनतेकडून निधी गोळा करायला त्यांचे रोड शोज् केले जायचे.

 

प्राण्यांशी जबरदस्त गट्टी
प्राण्यांशी जबरदस्त गट्टी

 

‘वाघ सिंह माझे सखे सोबती’ हे त्यांचं आत्मचरित्रही विलक्षण आहे. यात त्यांच्या लहानपणापासून ते सर्कसमधून रिटायर झाल्यावर यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते त्यांच्या झालेल्या सत्कारापर्यंतचा त्यांचा सगळा थरारक प्रवास त्यांनी मांडला आहे. हा माणूस वेगळाच असावा. मुक्या प्राण्यांशी त्यांचं घट्ट नातं होतं. त्यांच्या या पुस्तकात त्यांनी प्राण्यांच्या सवयी, त्यांचं मानसशास्त्र, हिंस्त्र प्राण्यांना प्रशिक्षित करताना त्यांनी वापरलेल्या क्लृप्त्या याचं जबरदस्त वर्णन आहे. त्यांची त्यांच्या सर्कशीतल्या प्राण्यांशी प्रचंड गट्टी होती. एकदा ते वाघांचे खेळ करत वाघाच्या पिंजऱ्यात असताना सर्कशीतल्या तंबूतली वीज गेली होती. तरीही या मिट्ट काळोखात त्यांच्या आसपासच्या या प्राण्यांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही. याशिवाय त्यांचे युरोप अमेरिकेतले दिवस तसंच दुसऱ्या महायुध्दातल्या आठवणी यामुळे हे पुस्तक भन्नाट झालंय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातली कसबा पेठ कुठे, ब्रम्हपुत्रेच्या पुराने वेढलेला आसाममधला सर्कशीचा तंबू कुठे, दुसरं महायुध्द कुठे आणि रिंगलिंग ब्रदर्स बार्नुम बेली कुठे. भारतातल्या जनतेला स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण होण्याच्या काळात या माणसाने विलक्षण आयुष्य जगत अनुभवांचा खजिना मराठी जनतेपुढे आणला. विस्मृतीत गेलेल्या या  जबरदस्त व्यक्तिमत्त्वाशी निगडित असलेल्या ‘रिंगलिंग ब्रदर्स अँड बार्नुम बेली सर्कस’चा शेवटचा खेळ होणार ही कल्पना मनाला म्हणूनच चटका लावून जाते.