इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे समर्थक आणि सुरक्षा दलांत  उडालेल्या चकमकींत ठार झालेल्यांची संख्या आता ७२ झाली आहे.
गेले दोन दिवस सुरू असलेल्या या धुमश्चक्रीत ७९२ लोक जखमी झाले आहेत. मोर्सी यांना ३ जुलै रोजी पदच्युत करण्यात आल्यानंतर झालेल्या बंडाच्या पाश्र्वभूमीवर आता झालेला हिंसाचार सर्वात भीषण होता.
दरम्यान, इजिप्तमध्ये गेले दोन दिवस सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर अमेरिका, कॅनडा आणि संयुक्त राष्ट्रांनी तेथे शांतता आणि सलोख्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी इजिप्तचे नेते मोहम्मद अल् बर्देई आणि हंगामी परराष्ट्रमंत्री नाबील फाहमी यांच्याशी चर्चा केली. हिंसेमुळे उपखंडात शांतता प्रस्थापित करण्यात पीछेहाट होऊ शकते, असे मत केरी यांनी व्यक्त केले.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री च्युक हॅगेल यांनी इजिप्तचे संरक्षणमंत्री जनरल अब्दुल फताह-अल्-सिसी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.