संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची माहिती

लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वयासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सीडीएस) पद निर्माण करण्याबरोबरच संरक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याचा निर्णय काही महिन्यांत घेण्यात येणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. तिन्ही दलांना स्वत:च्या अधिकारकक्षेत हस्तक्षेप नको असला तरी या दलांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे पर्रिकर यांनी स्पष्ट केले.

तिन्ही दलांच्या समन्वयाबाबत त्यांच्या प्रमुखांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून मांडण्यात येणाऱ्या मुद्दय़ांबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे पर्रिकर म्हणाले. या दलांनी संयुक्तपणे केलेल्या उत्तम कामगिरीमुळे भारताच्या अलीकडच्या कारवाया यशस्वी झाल्याचेही पर्रिकर यांनी नमूद केले.

कारगिल युद्धाच्या पाश्र्वभूमीवर एप्रिल २००० मध्ये राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी मंत्रिगट स्थापन करण्यात आला होता. या मंत्रिगटाने २००१ मध्ये ‘सीडीएस’ पद निर्माण करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस अमलात आली तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची ती पहिली मोठी लष्करी सुधारणा ठरेल.