Kejriwal-Poster-450Arvind-kejriwal-620x400‘आम आदमी’ पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ‘भगतसिंग क्रांति सेने’द्वारे दिल्ली शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. या पोस्टरमध्ये केजरीवाल यांचा उल्लेख ‘हिटलर’ असा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच पोस्टर्सवर अलिकडेच ‘आप’मधून हकालपट्टी करण्यात आलेल्या योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या नेत्यांचे समर्थन करण्यात आले आहे.
‘आप में यदि रहना होगा, अरविंद-अरविंद कहना होगा।’, पोस्टरवरील या घोषवाक्याद्वारे ‘आप’मध्ये केवळ केजरीवाल हेच सर्वेसर्वा असून, पक्षाशी निगडीत सर्व निर्णय फक्त तेच घेतात हे दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्टरवर केजरीवाल यांचा ‘हेल हिटलर’ असा उल्लेख करण्यात आला आहे. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या या पोस्टर्सवरून ‘आप’मधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे जाणवते.