मुंबईत २६/११ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार असलेला ‘जमात उद दावा’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज महंमद सईद याने दिल्लीतील एका प्रसिद्ध स्मारकावर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे शहरात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर पाच भारतीय जवानांचा पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर देशात संतापाचे वातावरण असताना हाफिज सईद याने हल्ल्याची धमकी देऊन आगीत तेल ओतले आहे. गुप्तचरांच्या अहवालानुसार दिल्ली पोलिसांना हाफिज सईदने दिलेल्या या धमकीची कल्पना दिली असून त्यामुळे दिल्लीतील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी लाहोर येथे सईद याने इद उल फित्रचा प्रार्थना मेळावा घेतला. त्यानंतर त्याने हल्ल्याची धमकी दिल्याचे हे वृत्त आले आहे.
सईदच्या नेतृत्वाखाली ईदची प्रार्थना
 लाहोर : हाफिज सईद याने शुक्रवारी येथील गदाफी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या ईदच्या नमाजाचे नेतृत्व केले. काश्मीर, पॅलेस्टाइन आणि ब्रह्मदेशातील दुर्लक्षित वर्ग स्वातंत्र्याच्या हवेत ईदचा नमाज पढण्याची वेळ जवळ येत असल्याचे जमात-उद-दावाच्या प्रमुखांनी ट्विट केल्यानंतर काही तासांतच सईदने गदाफी स्टेडियमवर नमाज अदा केला. सईद याच्यासमवेत हजारो जणांनी नमाज पढला. सईदवर अमेरिकेने १० दशलक्ष डॉलरचे इनाम जाहीर केले आहे. या नमाजापूर्वी शहरातील अनेक रस्त्यांवर सईदचे छायाचित्र असलेली पोस्टर्स लावणयात आली होती. पाकिस्तानात सईदकडून सातत्याने भारतविरोधी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून भारताने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी अनेकदा पाकिस्तानकडे केली आहे. मात्र सईदविरोधात कोणताही पुरावा नसल्याचा कांगावा सातत्याने पाकिस्तानकडून केला जात आहे.
काश्मीर, पॅलेस्टाइन आणि ब्रह्मदेशातील दुर्लक्षित वर्ग लवकरच मोकळ्या हवेत ईद साजरी करेल. या अत्यंत कसोटीच्या काळात आम्ही तुम्हाला ईद-मुबारक अशा शुभेच्छा देतो, तुमचा विजय झाल्यावर लवकरच सर्व जग तुम्हाला ईद- मुबारक, अशा शुभेच्छा देईल.
हाफिज सईद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरीफ अपेक्षा!
अलीकडेच प्रत्यक्ष ताबारेषेवर झालेल्या चकमकीत पाकिस्तानी लष्कराच्या एका खास गटाने केलेल्या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले होते. भारताने या हल्ल्याचा ठपका पाकिस्तानी लष्करावर ठेवला होता. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या प्रत्यक्ष ताबारेषेवर घडलेल्या चकमकीबाबत दु:ख व्यक्त केले असून दोन्ही देशांच्या नेतृत्वाने परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर विश्वास निर्माण करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले पाहिजे. प्रत्यक्ष ताबारेषेवर शस्त्रसंधीचे पालन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. लष्कर-लष्कर पातळीवर संवाद साधून गैरसमज दूर केले पाहिजेत, तसेच परिस्थिती चिघळू देता कामा नये अशी अपेक्षा शरीफ यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi faces let threat security stepped up after inputs from ib reports
First published on: 10-08-2013 at 05:38 IST