तिहार कारागृह प्रशासनाला म्हणणे मांडण्याचे आदेश

नवी दिल्ली : दिल्ली सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीने मानसिक विकार, स्मृतिभ्रंश आणि डोक्याला व हाताला झालेल्या जखमांवर अधिक चांगले उपचार करण्याची मागणी करणारी याचिका केली असून त्याबाबत तिहार कारागृह प्रशासनाला बाजू मांडण्याचे आदेश गुरुवारी दिल्ली न्यायालयाने दिले.

या प्रकरणातील आरोपी विनयकुमार शर्मा याने ही याचिका केली असून त्याबाबत शनिवापर्यंत म्हणणे मांडावे, असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती धर्मेद्र राणा यांनी तिहार कारागृह प्रशासनाला दिला आहे. शर्मा याने स्वत: तिहार कारागृहातील भिंतीवर डोके आपटून इजा करून घेतली आहे, असे कारागृहातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

रविवारी दुपारी कारागृह क्रमांक तीनमध्ये ही घटना घडली, त्यामध्ये विनयकुमार याला किरकोळ दुखापत झाली आणि त्यावर कारागृहातच उपचार करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाने या याचिकेला विरोध केला.

विनयकुमार शर्मा याने त्याच्या आईसह अनेकांना ओळखले नाही, असे त्याच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले. शर्मा याच्या नातेवाईकांच्या विनंतीवरून वकिलांनी कारागृहात जाऊन त्याची भेट घेतली तेव्हा विनयकुमार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे, उजवा हात मोडल्याने त्याला प्लास्टर केल्याचे, मानसिक विकाराने व स्मृतिभ्रंशाने त्रस्त असल्याचे आपल्याला आढळले, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. शर्मा याने कारागृहात त्याची आई आणि वकिलांनाही ओळखले नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.