Delhi Red Fort Blast Faridabad White Collar Terror Module : दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर देशभर फरीदाबाद मॉड्यूल तथा व्हाइट कॉलर मॉड्यूलची बरीच चर्चा ऐकायला मिळत आहे. इमाम इरफान अहमद हा दहशतवादी फरीदाबाद मॉड्यूलचा सूत्रधार असल्याचं सांगितलं जात आहे. जो कथितरित्या मेडिकलच्या (वैद्यकीय महाविद्यालयातील) विद्यार्थ्यांना कट्टरपंथी बनवत होता. उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश करून त्यांना कथित जिहादसाठी तयार करत होता.
इरफान हा जम्मू-काश्मीरमधील शोपियां भागातला रहिवासी असून त्याला जम्म-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. तो श्रीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पॅरामेडिकल कर्मचारी म्हणून काम करत होता.
इरफान वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संपर्कात होता
एनडीटीव्हीने गुप्त सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की इरफान हा वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्कात होता. यासह तो नौगाममधील एका मशिदीत इमामही होता. त्याने हळूहळू मेडिकलच्या विद्यार्थ्यांना, प्रामुख्याने फरिदाबादमधील विद्यार्थ्यांना कट्टरपंथी बनवलं.
इरफानवर ‘जैश’चा प्रभाव
इरफान अहमद हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेपासून प्रभावित होता. तो विद्यार्थ्यांना ‘जैश’शी संबंधित व ‘जैशचा म्होरक्या मसूद अजहरच्या भाषणांचे व्हिडीओ दाखवत असे. तसेच तो सॅटेलाइट फोनद्वारे अफगाणिस्तानमधील व्यक्तींशी संपर्कात होता.
दिल्लीमधील बॉम्बस्फोटाचं कारण काय?
विद्यार्थ्यांच्या मनात अगदी खोलवर कट्टरपंथी विचारसरणी रुजवणे हे त्याचं प्राथमिक उद्दीष्ट होतं. त्यास डॉ. मुझम्मिल शकील व डॉ. मोहम्मद उमर यांचं पाठबळ होतं. फरीदाबाद मॉड्यूल उघडकीस आल्यानंतर बिथरलेल्या डॉ. मोहम्मद उमर याने दिल्ली बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा दावा केला जात आहे. मौलवी इरफान अहमद व उमर सातत्याने संपर्कात होते.
हल्ल्यासाठी पैसे कोणी पुरवले?
उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील रहिवासी डॉ. शाहीन सईद हीने या दहशतवादी हल्ल्यासाठी आर्थिक पाठबळ दिल्याचं तपासात समोर आलं आहे. शाहीन ही अल-फलाह विद्यापीठात अध्यापनाचं काम करत होती. शाहीन ही जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा जमात अल-मोमिनत इंडियाची कमांडर आहे. ती या बॉम्बस्फोटाची प्रमुख वित्तपुरवठादार व सूत्रधार आहे.
आठ जणांना बेड्या
दरम्यान, इरफान अहमद व त्याच्याशी संबंधित इतर आठ जणांना पोलीस व केंद्रीय संरक्षण यंत्रणांनी बेड्या ठोकल्या आहेत यात आरिफ निसार दार उर्फ साहील, यासीर उल अश्रफ, मकसूद अहमद दार उर्फ शाहीद (तिघे राहणार- नौगाम, श्रीनगर), मौलवी इरफान अहमद (रा. शोपियाँ), जमीर अहमद अहंगर उर्फ मूटलाशा (रा. वाकुरा, गांदरबल), डॉ. मुजम्मिल अहमद गेनी उर्फ मुसेब (रा. कॉइल, पुलवामा), डॉ. आदिल (रा. वानपुरा, कुलगाम) अशी या सात जणांची नावे आहेत. तसेच डॉ. शाहीनलाही अटक केली असून ती लखनौमधील आहे.
