राजस्थानातील बिकानेरमध्ये एका महिलेवर २३ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला नवी दिल्ली येथील रहिवासी आहे. या प्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार, २५ सप्टेंबर रोजी बिकानेरच्या रिदमलसार पुरोहितन परिसरात आले होते. दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास बिकानेरला जाण्यासाठी जयपूर रस्त्यावर वाहनाची वाट पाहत उभी होते. थोड्या वेळात माझ्याजवळ कार थांबली. त्यातून दोघे जण खाली उतरले. त्यांनी लिफ्ट देण्याबाबत विचारले असता नकार दिला. त्यांनी जबरदस्तीने माझे हात धरले आणि तोंड दाबून मला कारमध्ये बसवले आणि घेऊन गेले. थोड्या अंतरावर नेऊन तिथे बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी काही मित्रांना फोन करून बोलावून घेतले. त्यांनीही बलात्कार केला. तेथून ते मला एका कार्यालयात घेऊन गेले. तेथे आणखी काही जणांनी बलात्कार केला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी जय नारायण व्यास कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला आरोपींपैकी दोघांना नावाने ओळखत होती. त्यांच्याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी राजू आणि सुभाष या दोघांना अटक केली. तसेच इतर चौघांनाही अटक करण्यात आली आहे. तर आरोपींनीही या महिलेवर आरोप केले आहेत. महिलेला पूर्वीपासूनच ओळखत असल्याचा दावा आरोपींनी केला आहे. ही महिला वेश्याव्यवसाय करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.