चलनमागणी पूर्ण करताना रिझव्‍‌र्ह बँकेची तारांबळ

येत्या शुक्रवारी, ३० डिसेंबर रोजी बाद चलनातील पाचशे व हजारच्या नोटा बँकेत स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर नव्या वर्षांत एटीएममध्ये, बँकांमध्ये पुरेशी रोकड येईल व आपला जाच संपुष्टात येईल, अशा आनंदात तुम्ही असाल, तर त्या आनंदाला आत्ताच जरा आवर घाला, कारण रोकड रकमेची मागणी व नव्या चलनाची छपाई यांचा मेळ घालताना रिझव्‍‌र्ह बँकेची कमालीची तारांबळ उडाली असून त्यामुळे नोटार्निबध ३० डिसेंबरपुढेही लांबण्याची भीती आहे.

नोटाबंदीनंतर, ‘५० दिवस सबुरी राखा’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आवाहनातील ५० दिवसांची मुदत येत्या मंगळवारी संपुष्टात येत आहे, तर बाद नोटा स्वीकारण्याची मुदत शुक्रवारी संपत आहे. एटीएम, तसेच बँकांतून रोकड काढण्यावर सध्या र्निबध आहेत; ते येत्या शुक्रवारनंतर मागे घेतले जातील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. मात्र आजची रोकडउपलब्धता व नव्या चलनछपाईचा वेग पाहता, ती शक्यता प्रत्यक्षात येणे कठीण असल्याची कबुली बँकेचे अधिकारीच देत आहेत.

‘‘शुक्रवारनंतरचे दोन दिवस शनिवार व रविवार बँकांना सुट्टी असेल. सोमवारी बँका उघडताना खात्यातील पैसे काढण्याबाबतचे र्निबध काही प्रमाणात शिथिल होऊ शकतात, मात्र ते पूर्णपणे हटवले जाणे अशक्य आहे, असे आमच्यातील बहुतेकांना वाटते आहे,’’ असे सार्वजनिक क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. ‘‘आजच्या घडीला बँकेतून २४ हजार रुपये काढण्याची मुभा असली तरी तेही देताना बँकांची दमछाक होत आहे. त्यामुळे त्यावरील र्निबध पूर्णच हटविण्यात आले तर विपरीत स्थिती निर्माण होईल. ‘‘हे र्निबध टप्प्याटप्प्याने हटवणे, हाच त्यावरील उपाय असू शकतो,’’ असे तो म्हणाला.

नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या स्थितीत त्रस्त झालेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे मतही असेच आहे. ‘‘रोकड काढण्यावरील र्निबध एकाच झटक्यात मागे घेणे योग्य ठरणार नाही. हे र्निबध टप्प्याटप्प्याने मागे घेणे हे बँकांच्या व खातेदारांच्याही हिताचे ठरेल,’’ असे मत अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघाचे सरचिटणीस हरविंदर सिंग यांनी व्यक्त केले.

पुढचा घाव बेनामी मालमत्तांवर

‘‘देशातील भ्रष्टाचार, काळा पैसा निपटून काढण्यासाठीच्या लढाईची आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. नोटाबंदी अमलात आली. आता केंद्र सरकारचा यापुढील घाव बेनामी मालमत्तांवर घातला जाईल. त्या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये जाहीर केले. मोबाइल बँकिंग, तसेच रोकडरहित ई-व्यवहारांना चालना देण्यासाठी ‘भाग्यवंत ग्राहक योजना’ व ‘दिगी धन व्यापार योजना’ या दोन योजना रविवारपासूनच अमलात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.