खोटं बोलायचं आणि तेपण रेटून बोलायचं हेच धनंजय मुंडे यांचं धोरण असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये भाजपाला मतदान न झालेल्या बूथची यादी मागवल्याचा आरोप करत यात आपल्याला ईव्हीएम हॅकिंगची शंका वाटते आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. याच आरोपांना उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं धोरण म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल असंच आहे असं म्हटलं आहे.

मी बीडमधल्या कोणत्याही बूथची यादी अद्याप तरी मागवलेली नाही. निकालानंतर आपल्याला कोणत्या भागात किती मतदान झाले याची माहिती प्रत्येक नेत्याला मिळतेच. शिवाय निवडणुकीत कोणत्या भागात किती मतदान झालं याचाही आढावा प्रत्येक नेता घेतच असतो. धनजंय मुंडे यांनीही तो आढावा घेतलाच असेल मग त्यात गैर काय आहे? असंही पंकजा मुंडे यांनी विचारलं आहे. धनंजय मुंडे हे माझे भाऊ आहेत मी त्यांना लहानपणापासून ओळखते खोटं बोल पण रेटून बोल हेच त्यांचं धोरण आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा टोला लगावला आहे.

एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा युतीला जागा कमी होताना दिसत आहेत. मात्र युतीला ३८ ते ४४ जागा मिळतील
असा अंदाज पंकजा मुंडे यांनी वर्तवला आहे. मराठवाड्यातल्या आठही जागा आम्हीच जिंकू असंही त्यांनी म्हटलं आहे.