पॅलेस्टिनी नेता यासर अराफत यांच्या मृतदेहाचे अवशेष मंगळवारी आठ वर्षांनंतर बाहेर काढण्यात आले. अराफत यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला होता का, हे तपासून पाहण्यासाठी त्यांच्या अवशेषांतील काही भागांची वैद्यकीय चिकित्सा करण्यात येणार आहे.
एका महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान अराफत यांना उलटी होऊन ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना पॅरिसजवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ११ नोव्हेंबर २००४ या दिवशी त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत्यूसमयी ७५ वर्षांचे असणाऱ्या अराफत यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला होता.
त्यामुळे भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता कमालीची गुप्तता राखत त्यांच्या मृतदेहाचे अवशेष त्यांच्या कबरीतून काढून वैद्यकीय चिकित्सेसाठी पाठवण्यात आले. या अवशेषांना स्पर्श करण्याची अनुमती केवळ पॅलेस्टिनी डॉक्टरना देण्यात आली असून या डॉक्टरना स्वित्र्झलड, रशिया आणि फ्रान्स येथील डॉक्टर साह्य करणार आहेत.