परदेशातील बँकांत भारतीयांच्या असलेल्या खात्यांची माहिती सध्या जाहीर करता येणार नाहीत, अशी कबुली द्यावी लागल्याने अडचणीत आलेल्या भाजपने आज काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. काळ्या पैसे असलेल्या बँक खात्यांची माहिती जाहीर केल्यास काँग्रेस अडचणीत येईल, असा गर्भित इशारा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दिला.
काळा पैसा असलेल्या खातेधारकांची नावे लवकरच जाहीर केली जातील. ही नावे जाहीर झाल्यानंतर आमची (भाजपची) कोणतीही अडचण होणार नाही. परंतु त्या नावांमुळे काँग्रेसची मात्र पंचाईत होईल, असे सूचक वक्तव्य जेटली यांनी एनडीटीव्हीशी बोलताना केले. या खातेधारकांची नावे लवकरच न्यायालयात जाहीर करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
काळा पैसा असलेल्यांची नावे भाजप सरकार जाहीर करणार नाही, अशा आशयाचे वृत्त आल्यानंतर काँग्रेसने भाजपावर ढोंगीपणाचा आरोप केला होता. मात्र या आरोपाचे खंडन करताना जेटली म्हणाले, प्रसारमाध्यमांनी या साऱ्या प्रकाराचे चुकीचे वृत्तांकन केले आहे. आम्ही नावे जाहीर करणार नाही, असे म्हटल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले. परंतु आम्ही फक्त ‘कायद्यानुसार योग्य त्या पद्धतीने आम्ही नावे जाहीर करू’, असे म्हटल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले.
भारताचा जर्मनीबरोबर द्विस्तरीय करप्रणालीचा करार आहे. या करारामुळे काळा पैसा असणाऱ्या खातेधारकांची नावे जाहीर करण्यात अडथळा आहे. परंतु न्यायालयात ती उघड करण्यात  कोणताही अडथळा नाही. आणि न्यायालयात ही नावे उघड केल्यानंतर ती प्रसारमाध्यमांत येणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.