करोना विषाणूला निष्क्रिय करणारा जैविक रेणू वेगळा काढण्यात यश आले असून त्यात भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा समावेश आहे. हा रेणू म्हणजे एक प्रतिपिंड असून तो सार्स सीओव्ही २ म्हणजेच कोविड १९ विषाणूला नष्ट करतो. मूळ प्रतिपिंडापेक्षा याचा आकार दहा पट लहान असून त्याचा उपयोग ‘एबी ८’ या औषधात केला जातो.

करोना संसर्गानंतर शरीरात प्रतिपिंड तयार होत असले तरी ते सर्वच उपयोगाचे नसतात. जे करोनाच्या प्रथिनांवर आघात करतात त्याच प्रतिपिंडांचा उपयोग असतो. त्यांना ‘न्यूट्रलायजिंग अँटीबॉडी’ म्हणजे विषाणूला निकामी करणारे प्रतिपिंड म्हणतात. नव्याने शोधण्यात आलेला रेणू हा विषाणूला निकामी करणारा लहान प्रतिपिंड आहे.

‘सेल’ नावाच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाचे श्रीराम सुब्रमणियम यांचा समावेश आहे. सार्स सीओव्ही २ म्हणजे करोनाला रोखणारा एबी ८ हा रेणू जास्त प्रभावी आहे. तो उतींमध्ये फार पटकन मिसळतो व लगेच विषाणूला निकामी करतो.  हा रेणू वापरून तयार केलेले औषध श्वासावाटेही देता येऊ शकेल, हा त्याचा फायदा असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हा औषधी रेणू म्हणजे प्रतिपिंड पेशीला चिकटत नाही, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. एबी ८ रेणू हा आश्वासक असून त्याचा करोना विषाणूला रोखण्यासाठी प्रभावी वापर करता येईल, असे अमेरिकेतील पीटसबर्ग विद्यापीठातील जॉन मेलॉर्स यांनी म्हटले आहे . जास्त मोठय़ा आकाराचे जे प्रतिपिंड म्हणजे प्रथिन रेणू असतात ते इतर रोगात चांगले काम करतात. पण लहान आकाराचा हा प्रतिपिंड वेगळा असून तो इम्युनोग्लोब्युलिन या रक्तातील प्रतिपिंडाचा व्हीएच साखळीतील एक प्रकार आहे.

नवीन औषधासाठी प्रयत्न

सार्स सीओव्ही २ प्रथिनाचा वापर  केल्यानंतर तो  १०० अब्ज संभाव्य रेणूतून शोधण्यात आला आहे. व्हीएच साखळी ही इम्युनोग्लोब्युलिनमध्ये पसरते तेव्हा एबी ८ प्रतिपिंड तयार होते. लहान असूनही तो मोठय़ा प्रतिपिंडासारखेच पूर्ण क्षमतेने काम करतो. करोना रुग्णांसाठी प्रतिपिंड असलेला रक्तद्रव वापरणे हा एक उपाय असला तरी पुरेशा प्रमाणात रक्तद्रव उपलब्ध होताना दिसत नाही, किंबहुना रक्तद्रव देण्यास बरे झालेले रुग्ण पुढे येतीलच असे नाही. त्यामुळे सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणूला रोखणारे प्रतिपिंड वेगळे काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला असून त्यातून नवीन औषध तयार करता येईल.