शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या ‘इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ अर्थात इफ्को या सहकारी संस्थेने आपल्याच अधिकाऱ्यांना दिलेल्या भल्यामोठय़ा निवासस्थानांमुळे ही संस्था अडचणीत आली आहे.
या निर्णयावर चौफेर टीका झाल्यानंतर निवासस्थाने मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांनी ती परत देऊ केली आहेत. इफ्कोने मात्र अधिकाऱ्यांना निवासस्थाने देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक यू. एस. अवस्थी यांना दक्षिण दिल्लीतील हौस खास या उच्चभ्रू वस्तीमध्ये एक हजार चौरस यार्ड क्षेत्रफळाचे, तर व्यवस्थापकीय सहसंचालक राकेश कपूर यांना वसंत विहार परिसरातील दुमजली निवासस्थान संचालक मंडळाने वितरित केले होते.
या मालमत्तांची किंमत कोटय़वधी रुपये असल्याने तसेच ही जागा इफ्कोच्या मालकीची असल्याने या निर्णयावर टीकेची झोड उठली होती.
या टीकेमुळे व्यथित झालेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांनी या जागा परत करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे आमची संस्था अडचणीत येत असेल तर मी ही मालमत्ता परत करणे पसंत करेन, मी तसा निर्णय घेतला असून संस्थेच्या अध्यक्षांना तसे पत्रही पाठविले आहे, अशी प्रतिक्रिया अवस्थी यांनी व्यक्त केली. कपूर यांनीही असाच निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या संस्थेचे अध्यक्ष एन. पी. पटेल यांनी मात्र अधिकाऱ्यांना जागा देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
अवस्थी आणि कपूर यांनी संस्थेला दिलेल्या सेवेचा मोबदला म्हणून त्यांना ही निवासस्थाने देण्यात आली आहेत, यामध्ये कोणतेही बेकायदा कृत्य अथवा भ्रष्टाचार झालेला नाही, या निर्णयावरून होणारी टीका निव्वळ गैरसमजातून होत आहे. या अधिकाऱ्यांना दिलेल्या जागा ही सार्वजनिक नसून संस्थेची मालमत्ता आहे, हे ध्यानात घ्यावे. या दोन अधिकाऱ्यांच्या जागा परत करण्याच्या निर्णयावर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.