युद्धखोरीच्या गुन्ह्य़ांप्रकरणी श्रीलंका सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या अमेरिकेच्या ठरावाला भारताने पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी संयुक्त पुरोगामी आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या द्रविड मुन्न्ोत्र कळघमने (द्रमुक) आपली प्रतिष्ठा पणाला लावली आह़े  मंगळवारी चेन्नईत या मागणीसाठी पक्षाच्या सुमारे चार हजार कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली़ तर नवी दिल्लीतही संसद भवनाबाहेर द्रमुक खासदारांनी घोषणाबाजी केली.
अमेरिका लवकरच संयुक्त राष्ट्राच्या निर्वासित उच्चायुक्तांपुढे (यूएनएचआरसी) तामिळ अतिरेक्यांविरोधात श्रीलंकेच्या कारवाईतील युद्ध गुन्हेगारांवर कारवाईची मागणी करणारा ठराव मांडणार आह़े  या ठरावाला भारताचा पाठिंबा मिळविण्यासाठी द्रमुकचे अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत़  ‘अमेरिकेचा हा ठराव नक्कीच यशस्वी होईल़  त्यासाठी भारतानेही सहकार्य करावे, एवढीच आमची मागणी आहे,’ असे द्रमुक प्रमुख एम़  करुणानिधी यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितल़े
या आंदोलनाचे नेतृत्व करुणानिधी यांचे पुत्र आणि द्रमुकचे कोषाध्यक्ष एम़  के. स्टॅलिन यांनी केले होत़े  द्रमुकच्या या आंदोलनाला तामिळ इलाम सपोर्टर्स ऑर्गनायझेशन (टीईएसओ) यांनी पाठिंबा दिला होता़  दोन्ही संघटनांच्या हजारो निदर्शकांनी श्रीलंकेच्या उप-उच्चायुक्तालयाच्या दिशेने कूच केली़  त्यामुळे त्यांना वाटेत अटक करण्यात आली. या वेळी स्टॅलिन यांच्याबरोबरच द्राविदर कळघमचे प्रमुख के. वीरमणी आणि विदुथालाई चिरुथाईगल काटचीचे संस्थापक खासदार थोल थिरुमवलम यांनाही अटक झाली़
या ठरावाला पाठिंबा देण्याची कोण्या एका पक्षाची मागणी नाही, तर हा तामिळनाडूच्या जनतेचा हा एकत्रित आवाज आह़े  याची जाणीव केंद्र शासनाला करून देण्यासाठी मंगळवारचे आंदोलन केवळ चेन्नईपुरते मर्यादित राहणार नाही़  तर राज्याच्या अन्य भागांतही यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, असे करुणानिधी यांनी सांगितल़े
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीमध्येही द्रमुकच्या खासदारांनी काळे शर्ट घालून संसदेत प्रवेश केला़  त्या आधी त्यांनी संसदेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला होता़  केंद्र शासनाने अमेरिकेच्या ठरावाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडण्याचेच प्रमुख उद्दिष्ट आजच्या आंदोलनामागे होते, असे द्रमुकच्या राज्यसभा खासदार कनिमोळी यांनी या वेळी सांगितल़े  तसेच भारताने यासारख्याच ठरावाला मागील वर्षी पाठिंबा दिला असल्याची बाब त्यांनी या वेळी लक्षात आणून दिली़