सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेमुळे कर्नाटकमध्ये पुढील वर्षी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक भाजपसाठी अवघड ठरण्याची शक्यता आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा या मागणीसाठी सध्या कर्नाटकमध्ये आंदोलन सुरू आहे. यासाठी काल बेळगावमध्ये मोर्चाही काढण्यात आला होता. त्यावेळी आमच्या प्रकरणात ढवळाढवळ करू नका, असा थेट संदेश लिंगायत समाजाच्या नेत्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना दिला. मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी हुबळी येथे लिंगायत समाजातील गुरूंची भेट घेतली होती. त्यावेळी स्वतंत्र धर्माचा हट्ट सोडून द्या, असा सल्ला भागवतांनी लिंगायत समाजाला दिल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील कालच्या मोर्च्यात माते महादेवी यांनी भागवत यांना खडे बोल सुनावले. सरसंघचालकांनी आम्हाला परावृत्त करण्यापेक्षा स्वत:चे राजकीय वजन वापरून आमचे म्हणणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवावे. जेणेकरून लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. आम्ही मोहन भागवतांप्रमाणे पुराणकालीन मुल्यांना नव्हे तर आधुनिक लोकशाहीच्या मुल्यांना धरून जगत आहोत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून सल्ला घेण्याची काडीमात्र गरज नसल्याचे माते महादेवी यांनी म्हटले. माते महादेवी या लिंगायत आंदोलनाच्या अग्रणींपैकी एक आहेत. कर्नाटकमधील जातीय समीकरणांचा विचार करता लिंगायत समाजाची भूमिका निवडणुकांमध्ये नेहमीच निर्णायक राहिली आहे.

लिंगायतांच्या ‘वीरशैवी’करणाचा डाव

आम्ही कधीही हिंदूत्वाचा भाग नव्हतो. त्यामुळे हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा प्रश्नच उदभवत नाही. सरकारने आम्हाला स्वतंत्र धर्माचा दर्जा दिलेला नाही, ही बाब अलहिदा. मात्र, गेल्या ९०० वर्षांपासून आम्ही स्वतंत्ररित्या धार्मिक परंपरांचे पालन करत आहोत. आम्ही हिंदू धर्माचा भाग व्हायचा ठरवले तरी आमची गणना क्षुद्रांमध्ये होईल. त्यामुळेच लिंगायतांच्या परंपरांवर श्रद्धा ठेवणाऱ्या आमच्या समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची गरज असल्याचेही लिंगायत नेत्यांनी सांगितले.

…तर कर्नाटकात कमळ उमलणार नाही; भाजपची चिंता वाढणार