पुढील वर्षी कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटकमधील मतदार पुन्हा काँग्रेसलाच ‘हात’ देतील, असे ‘सी फोर’चे सर्वेक्षण सांगते. भाजपला कर्नाटकात संधी मिळणार नाही, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिल, असा अंदाज ‘सी फोर’ने वर्तवला आहे. कर्नाटकमध्ये जो पक्ष सत्ता स्थापन करतो, त्या पक्षाला पुढील लोकसभा निवडणुकीत अपयश येते, असे आतापर्यंत अनेकदा घडले आहे. त्यामुळे काँग्रेसला पुढील वर्षी कर्नाटकमध्ये यश मिळाल्यास, त्या पुढील वर्षातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागू शकतो.

‘सी फोर’ने १९ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान कर्नाटकात सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला १२० ते १३२ जागा मिळू शकतात. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार येऊ शकते. भाजपला ६० ते ७२ जागा मिळतील, अशी शक्यता या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४३ टक्के मते मिळतील, असा अंदाज ‘सी फोर’ने वर्तवला आहे. तर भाजपला ३२ टक्के मते मिळतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय जनता दल (एस)ला १७ टक्के मतदान होईल, असेही ‘सी फोर’ने म्हटले आहे.

कर्नाटकच्या १६५ विधानसभा क्षेत्रांमधील २४ हजार ६७६ लोकांसोबत संवाद साधून, त्यांची मते विचारात घेऊन सर्वेक्षण केल्याचे ‘सी फोर’ने म्हटले आहे. मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांची ‘अन्ना भाग्य’ योजना सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. मात्र राज्यात पिण्याचे पाणी, रस्ते, बेरोजगारी या प्रमुख्य समस्या आहेत. या मुद्यांवरुन अनेकांनी काँग्रेस सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

‘विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून अंतर्गत सर्वेक्षण सुरु आहे. या माध्यमातून सरकारच्या कार्यशैलीबद्दल लोकांना प्रश्न विचारण्यात येतील,’ असे कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षांनी सांगितले. ‘लवकरच पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेला सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यात येईल,’ असेदेखील त्यांनी सांगितले. याआधी कर्नाटकमध्ये भाजप सरकार स्थापन करेल, असा विश्वास भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी व्यक्त केला होता.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुराप्पा यांच्यावर पक्षातील अनेकजण नाराज आहेत. भाजपमधून बाहेर पडलेल्या येडियुराप्पांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला. येडियुराप्पा यांच्याविरोधात असणाऱ्या पक्षातील नेत्यांची संख्या मोठी आहे. तर हिंदू समाजाची एक प्रमुख शाखा असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाला मुख्य वृक्षापासून तोडण्याचे प्रयत्न कॉँग्रेसने सुरू केले आहेत. तुम्ही सारे एकत्र आलात तर स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी केंद्राकडे शिफारस करू असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले आहे. त्यांची ही काल यशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे.