Donald Trump done deal with China : अमेरिका आणि चीन यांच्यात एक नवीन व्यापारी करार झाला आहे, ज्या अंतर्गत अमेरिका आता चीनला दुर्मिळ खनीजे (rare earth minerals) आणि मॅग्नेट्स खरेदी करेल. तर या बदल्यात चीनी विद्यार्थ्यांना अमेरिकेतली महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येईल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी याबद्दलची घोषणा केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू होते, यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संबंध उत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे.
“आपल्याला एकूण ५५ टक्के कर मिळत आहे, चीनला १० टक्के मिळत आहेत. दोन्ही देशातील संबंध उत्कृष्ट आहेत!” अशी पोस्ट ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर केली आहे. असे असले तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प असेही म्हणाले आहेत की त्यांच्या आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मंजूरीनंतर पूर्ण होईल.
रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, व्हाईट हाऊस अधिकार्यांनी सांगितले की, या करारानंतर अमेरिका आयात केलेल्या चिनी वस्तूंवर ५५ टक्के कर आकारेल. ज्यामध्ये १० टक्के बेसलाईन रेसिप्रोकल टॅरिफ, फेंटानील तस्करीसाठी २० टक्के आणि आधीपासून अस्तित्वात असलेला २५ टक्के कर यांचा समावेश आहे. तर चीन अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालावर १० टक्के कर आकारेल.
“फुल मॅग्नेट आणि कोणत्याही आवश्यक रेयर अर्थ्स यांचा चीनकडून पुरवठा केला जाईल. याबरोबरच आम्ही मान्य केलं होतं त्याचा पुरवठा चीनला करू, ज्यामध्ये चिनी विद्यार्थी वापर करत असलेली (जे मला आधीपासूनच मान्य आहे!) आमची महाविद्यालये आणि विद्यापीठांचा समावेश आहे,” असे ट्रम्प म्हणाले आहेत.
अमेरिकन आणि चिनी अधिकार्यांनी बुधवारी सांगितले की, त्यांच्यात थांबलेल्या व्यापारी कराराचे पुनरुज्जीवन करण्याच्या आराखड्यावर सहमती झाली आहे. ज्यामध्ये चीनने रियर अर्थ इलेमेंट्सच्या निर्यातीवर लावलेली बंधने काढून टाकण्याचा देखील समावेश आहे. मात्र या करारामध्ये दोन्ही देशांमधील व्यापारी तणाव कमी करण्याच्या उद्देशाने दीर्घकालीन उपाय दिसून आले नाहीत.