डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींसाठी स्थळ शोधण्याची तयारी दर्शवली होती असा विनोद विदेशी प्रसारमाध्यमांमध्ये चघळला जात आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ६७ वर्षांचे असून ते एकटेच राहतात हे कळल्यावर अमेरिकेच्या अध्यक्षांनी असा प्रस्ताव मांडल्याची बातमी होती असं पॉलिटिकोनं म्हटलं आहे. विदेशी नेत्यांबद्दल स्वत:चं हसं करून घेणारी वक्तव्यं करण्यात ट्रम्प पुढे असून त्यांच्या अशा वक्तव्यांची एक भलीमोठी यादीच पॉलिटिकोच्या बातमीत देण्यात आली आहे. टेलीफोनसंदर्भातले शिष्टाचार असोत, चुकीचे उच्चार असोत वा अवघडलेल्या बैठका असोत ट्रम्प यांचं वागणं शिष्टाचाराला धरून नसल्याचे दाखले देण्यात आले आहेत.
दक्षिण आशियाबद्दल ट्रम्प यांना फारशी माहिती नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. गेल्या वर्षी व्हाईट हाऊसमध्ये मोदी व ट्रम्प यांची भेट झाली होती. असं सांगण्यात येतं की या भेटीपूर्वी ट्रम्प यांनी दक्षिण आशियाचा नकाशा बघितला आणि आपल्या सल्लागारांशी बोलताना नेपाळ व भूतानचा अत्यंत चुकीचा उल्लेख केला. सूत्रांचा दाखला देत पॉलिटिकोनं म्हटलंय की नेपाळ व भूतान हे भारतातच असल्याचा त्यांचा समज होता, किंबहुना असे काही देश आहेत हेच ट्रम्प यांना माहित नव्हतं.
याच मीटिंगच्यावेळी ट्रम्प यांनी सल्लागारांना विचारलं की मोदी आपल्या पत्नीसह येणार आहेत का? याबाबतची परिस्थिती कळल्यावर ट्रम्प यांनी म्हणे विनोद केला की मी त्यांची कुणाशी तरी गाठ घालून देईन. याबाबत बोलताना व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या साराह हुकाबी यांनी सांगितलं की ट्रम्प यांचे अमेरिकेच्या मित्रांसोबत अत्यंत घट्ट संबंध असून त्यामुळेच ते अशाप्रकारची अनौपचारिक वक्तव्यं करतात.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत लहान वयात तत्कालिन सामाजिक स्थितीप्रमाणे लग्न झाले होते. मात्र संसार न करता त्यांनी पत्नी व घर सोडले होते. त्यांनी संसार जरी केला नसली तरी कायदेशीररीत्या घटस्फोटही घेतलेला नाही व जाहीरपणे त्यांनी पत्नीबाबत कधी काही वक्तव्यंही केलेले नाही. मात्र, ट्रम्प यांना या सगळ्याची कल्पनाही नव्हती असं दिसून आलं आहे.
अर्थात, या एका गोष्टीखेरीज अन्य एका बाबतीतही ट्रम्प यांनी विनोद केल्याचा दाखला देण्यात आला आहे. त्यांनी मोदी यांच्या भारतीय उच्चारातल्या शब्दांची नक्कल केल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.