मुस्लिम ब्रदरहूडचे नेते मोहम्मद मोर्सी यांच्या राजवटीची पुन्हा एकदा स्थापना केली जावी, या मागणीसाठी मोर्सी समर्थकांनी इजिप्तमध्ये मोर्चा काढला. या मोर्चाने हळूहळू आंदोलनाचे वळण घेतले. मात्र इजिप्तच्या सैन्याने हे आंदोलन दडपण्यासाठी आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारात किमान ७५ जण ठार झाले असून असंख्य जण जखमी झाले आहेत.
इजिप्तमध्ये लोकशाही निवडणुकांच्या मार्गाने प्रथमच निवडून आलेल्या मोहम्मद मोर्सी यांना ३ जुलै रोजी लष्कराने पदभ्रष्ट केले होते. मोर्सी यांना लष्कराने आपल्या ताब्यात ठेवले आहे, त्यांची सुटका करावी, अशी मागणीही मोर्सी यांच्या कुटुंबीयांनी केली होती.
याच मागणीसाठी शुक्रवारी देशभरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्सी समर्थक आणि मोर्सी विरोधक अशा दोघांनीही मोर्चा शांततेने काढण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
मात्र प्रत्यक्षात, शनिवारी पहाटे या मोर्चावर लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात किमान ७५ आंदोलक ठार झाले असल्याचा आरोप मोर्सी समर्थकांनी केला. मात्र इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाने या गोळीबारात १९ जण ठार झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. अलेक्झांड्रिया आणि कैरो या देशांमधील सर्वात मोठय़ा शहरांमध्ये प्रचंड हिंसाचार उसळला होता.
या हिंसाचारात नेमके किती लोक जखमी झाले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र प्रत्यक्षदर्शीच्या मतानुसार जखमींचा आकडा हजारांमध्ये असू शकतो. या हिंसाचारप्रकरणी मुस्लिम ब्रदरहूडच्या ५३ जणांना अटक करण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.
हिंसाचार कुठे कुठे?
राजधानी कैरो, अलेक्झांड्रिया यासारखी शहरे, उत्तर इजिप्तमधील लक्झेर-महालाह, नाइलच्या त्रिभूज प्रदेशात वसलेल्या घारबिया प्रांतात, सिनाई भागात मुबारकविरोधी आंदोलन झाले त्या तहरीर चौकात आणि इत्तिहादिया पॅलेसनजीक या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या.
आंदोलनाचे कारण कोणते?
हिंसाचार आणि दहशतवादाविरोधात आपण बंड पुकारले असून आपल्या निवडीला जनतेचे समर्थन आहे हे दर्शविण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन लष्करप्रमुख अब्देल अल फताह सिसी यांनी केले होते. याउलट तुम्हाला स्वातंत्र्य हवे असेल तर रस्त्यांवर या, असे आवाहन मुस्लिम ब्रदरहूडच्या वतीने करण्यात आले होते. शुक्रवारी मोर्सी समर्थक आणि विरोधक त्यामुळेच कैरोच्या रस्त्यांवर आले होते.
मोर्सी यांची हाकलपट्टी आणि नव्या अध्यक्षांची नियुक्ती
गेले काही महिने इजिप्तचे अध्यक्ष मोर्सी यांच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले होते. त्यातच नव्या संविधान निर्मिती प्रक्रियेत अध्यक्षांना न्यायव्यवस्थेपेक्षा उच्च स्थान देण्यात आले होते. यामुळे मोर्सी यांनी सत्तेवरून पायउतार व्हावे यासाठी देशभरात आंदोलन उसळले होते. या आंदोलनाला इजिप्तच्या लष्कराचाही पाठिंबा होता. १ जुलै रोजी मोर्सी यांना लष्कराने पायउतार होण्यासाठी ४८ तासांची ‘डेड लाइन’ दिली. ३ जुलै रोजी मोर्सी सत्ताभ्रष्ट झाले. आणि त्यांच्याजागी अदले मन्सूर यांची निवड लष्करप्रमुख अब्देल फताह अल सिसी यांनी जाहीर केली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2013 रोजी प्रकाशित
इजिप्तमध्ये पुन्हा हिंसाचार! मोर्सी समर्थक आंदोलकांवरील गोळीबारात ७५ जण ठार
मुस्लिम ब्रदरहूडचे नेते मोहम्मद मोर्सी यांच्या राजवटीची पुन्हा एकदा स्थापना केली जावी, या मागणीसाठी मोर्सी समर्थकांनी इजिप्तमध्ये मोर्चा काढला.
First published on: 28-07-2013 at 05:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dozens of morsi supporters shot dead