मानवाच्या निसर्गावरील आक्रमणाबाबत अनेक दशके चिंता व्यक्त होत असली, तरी धरणीमातेची स्थिती मात्र दिवसेंदिवस बिकटतेची नवी पायरी गाठत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या ११ हजार ३०० वर्षांमध्ये पृथ्वीवरील तापमान नव्हते इतके उष्ण नोंदविले गेल्याने आगामी काळामध्ये वाढता पारा ही मानवी जीवनाची भीषण समस्या होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
जगभरातील सुमारे ७३ ठिकाणांवरील जीवाश्म व इतर दस्ताऐवजाआधारे पृथ्वीच्या तापमानाचा गेल्या ११ हजार वर्षांपासून ते आत्तापर्यंतचा इतिहास सादर करण्यामध्ये अभ्यासकांना यश आले आहे. शीतयुगाच्या म्हणजेच ११ हजार ३०० वर्षांपासून ते आत्तापर्यंतचा तापमान इतिहासाची वर्गवारी या अभ्यासकांनी काढली असता गेल्या १० वर्षांमध्ये वाढलेले तापमान हे सर्वाधिक नोंदले गेले. ११ हजार ३०० वर्षांमधील तापमानांच्या नोंदींहून ८० टक्के तापमान वाढ फक्त गेल्या १० वर्षांत झाली आहे, यावरून पृथ्वी तापमान वाढीची दु:स्थिती लक्षात येईल.
भीषण भविष्य काय? तापमान वाढीच्या आराखडय़ानुसार वातावरणीय बदलाची दिशा पाहता येत्या दशकभरात तापमान वाढ आणखी भीषण होणार आहे. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात कितीही बदल केले अथवा वातावरण संरक्षणाच्या कितीही उपायांना योजले, तरी तापमान वाढ ही अटळ असून, या तापमान वाढीची भरपाई मानवाला द्यावीच लागेल. मानवी संस्कृतीच्या गेल्या दोन हजार वर्षांमध्ये कधी तापली नव्हती, इतकी पृथ्वी आज तापली असल्याचे, अभ्यासगटाचे प्रमुख शॉन मारकॉट यांनी स्पष्ट केले.