दिल्ली, पंजाब, हरयाणा, जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील अन्य राज्य बुधवारी भूकंपाच्या धक्क्याने हादरले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.१ इतकी होती. भूकंपामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी भीतीपोटी रस्त्यावर पळ काढला.  भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये होता. भारतात भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

अफगाणिस्तानमधील फैजाबादपासून ६६ किलोमीटर अंतरावर हिंदूकुश पर्वतरांगेत भूकंपाचा केंद्रबिंदू होता.अफगाणिस्तान, पाकिस्तान व भारत या तीन देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपात पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. बलुचिस्तानमधील लासबेला येथे भूकंपामुळे घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. घराचे छत कोसळून लासबेला येथे एका लहान मुलीचा मृत्यू झाला. तर नऊ जण यात जखमी झाल्याचे पाकमधील वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.

संपूर्ण उत्तर भारतही भूकंपाच्या धक्क्याने हादरला. जवळपास ४० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. श्रीनगरमध्ये अनेकांनी रस्त्यावर पळ काढला. दिल्लीतील पत्रकार कुमार कुणाल यांनी देखील भूकंपाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. भारतात या भूकंपामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी झाली आहे का याचा आढावा घेतला जात आहे.