गेल्या काही महिन्यांपासून खाद्य तेलाच्या किमती आभाळाला भिडल्या आहेत. एकीकडे कच्च्या तेलामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत केव्हाच शंभरीपार गेल्या असताना खाद्य तेलाच्या किमतींमुळे महागाईची झळ थेट सामान्यांच्या पोटापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे हवालदील झालेल्या जनतेला दिवाळीच्या निमित्ताने मोठा दिलासा मिळाला आहे. खाद्य तेलाचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे याचा फायदा सामन्यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर सामान्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

देशात खाद्यतेलाचं उत्पादन करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्यांनी तेलाच्या होलसेल किमतींमध्ये घट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अदानी विलमर, रुची सोया, जेमिनी एडिबल्स, मोदी नॅच्युरल्स, गोकुळ रिफॉइल्स, विजय सॉल्वेक्स, गोकुळ अॅग्रो आणि एन. के. प्रोटेन्स या कंपन्यांचा समावेश आहे. सॉल्वेंट एक्ट्रॅक्टर्स असोसिएशन अर्थात एसईएनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या कंपन्यांनी आपल्या तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिटन तेलाच्या किमती ४ ते ७ हजारांनी कमी

या कंपन्यांनी होलसेल तेलविक्रीच्या किमतींमध्ये घट केली आहे. त्यानुसार, प्रतिटन तेलाच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यात प्रतिटन ४ हजार ते ७ हजार रुपये कमी केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या कंपन्यांकडून विक्री होणाऱ्या प्रतिलिटर तेलाच्या किमती ४ ते ७ रुपयांनी कमी झाल्या आहेत.

दरम्यान, जागतिक स्तरावर देखील खाद्यतेलाच्या पुरवठ्याची परिस्थिती सुधारू लागली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमतींवर देखील होण्याची शक्यता असून तेलाच्या किमती अजून कमी होऊ शकतात.