भवानीपूरच्या भाजप उमेदवार

पश्चिम बंगालच्या भवानीपूर मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रियंका तिबरेवाल यांनी उमेदवारी अर्ज भारताना आपल्या समर्थकांची मोठी गर्दी जमवून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार तृणमूल काँग्रेसने केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना कारणेदाखवा नोटीस जारी केली आहे.

तिबरेवाल यांनी कमीतकमी ५०० लोकांचा ‘अनियंत्रित जमाव’ गोळा करून आदर्श आचारसंहिता, तसेच करोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना प्रियंका यांनी सहसा दुर्गापूजा उत्सवादरम्यान केले जाणारे ‘धुनुची नाच’ हे पारंपरिक बंगाली नृत्य केले, असेही तक्रारीत म्हटले आहे. शंभुनाथ पंडित मार्गासह इतर ठिकाणी भाजपचे समर्थक मोठ्या संख्येत जमल्याने तेथे वाहतुकीची कोंडी झाल्याबाबत भवानीपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सादर केलेल्या अहवालाचाही निवडणूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या नोटिशीत उल्लेख करण्यात आला आहे.

प्रियंका तिबरेवाल यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावताना, आपले जे म्हणणे असेल ते आपण उत्तर म्हणून सादर करू असे सांगितले.

३० सप्टेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीत आपण लढत असल्याने तृणमूल काँग्रेस घाबरली असून, आपला प्रचार रोखण्यासाठी त्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे, असा दावा तिबरेवाल यांनी बुधवारी केला.