नवी दिल्ली : जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे निवडणूक आयोगाने बुधवारी सांगितले. निवडणुकीसाठी दोन्ही सभागृहांच्या खासदारांचे निर्वाचक गण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. लोकनियुक्त आणि नामनिर्देशित अशा दोन्ही खासदारांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार असतो.

निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अंतिम केले जात आहेत. आमची तयारी पूर्ण झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. जगदीप धनखड यांनी आरोग्याचे कारण देत सोमवारी राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७पर्यंत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणूक कधी?

राज्यघटनेच्या अनुच्छेद ६८चे पोटकलम २नुसार, उपराष्ट्रपतींचा मृत्यू, राजीनामा किंवा महाभियोग अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे त्यांचे कार्यालय रिक्त झाल्यास शक्य तितक्या लवकर निवडणूक घेतली जाईल. त्यानंतर निवडून आलेली व्यक्ती पदभार स्वीकारल्यापासून पुढील पाच वर्षांच्या पूर्ण कालावधीपर्यंत उपराष्ट्रपतीपदावर राहील. निवडणुकीची अधिसूचना काढल्यापासून मतदानाच्या तारखेपर्यंत ३० दिवसांचा कालावधी विहित केलेला असतो.