नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले व्हेल मासे पकडल्यानंतर त्यांच्या मांसापासून बनवलेल्या श्वानखाद्याची विक्री जपानमधील कुत्र्यांच्या मेजवानीसाठी केली जात आहे असे पर्यावरणवाद्यांनी म्हटले आहे.
उत्तर अ‍ॅटलांटिकमधील व्हेलमाशांपासून तयार केलेले श्वान खाद्य मिशिनोकू फार्म या टोकियोतील कंपनीने तयार केले आहे व तशी माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर दिली आहे. कमी उष्मांक, कमी चरबी व उच्च प्रथिने असे या श्वानखाद्याचे वर्णन करण्यात आले आहे. जपानच्या आयकॅन या प्रचार गटाने असे म्हटले आहे की, नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या व्हेल माशाच्या प्रजातीपासून तयार केलेले श्वान खाद्य विकणे हे पर्यावरणास घातक आहे.
दबाव गटाच्या कार्यकारी संचालक ननामी कुरासावा यांनी सांगितले की, जे जपानी लोक आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी व्हेल माशांपासून बनवलेले खाद्य विकत घेत आहेत, ते असे पदार्थ विकण्याच्या दुकानदारांच्या सापळ्यात अडकले आहेत.
मिशिनोकू या कंपनीच्या संकेतस्थळावर असेही म्हटले आहे की, हे खाद्यान्न मंगोलियन घोडे, कांगारू यांच्यापासून बनवलेले आहे. त्याचबरोबर व्हेलपासून बनवलेल्या श्वानखाद्याचे ६० ग्रॅमचे पाकिट ५.९७ डॉलरला विक्रीस आहे.
श्वानखाद्य तयार करण्यासाठी  २०१३ मध्ये आइसलँड येथे १८० व्हेल माशांची शिकार केली जाणार आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माशाच्या प्रजातीपासून श्वानखाद्य बनवणे आर्थिक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. जपानमध्ये आंतरराष्ट्रीय बंदी हुकमातील त्रुटींचा फायदा घेत व्हेल माशांची शिकार केली जाते तसेच आइसलँडमध्येही ही बंदी धुडकावण्यात आली आहे.