भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निवृत्तिवेतन मंडळाने देशभरातील आपल्या पाच कोटी सदस्यांना ई-पासबुक सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या ऑनलाइन सुविधेद्वारे दर महिन्याला सदस्यांना त्यांच्या खात्यातील रकमेची माहिती देण्यात येणार आहे, मात्र अद्याप ९४ लाख १३ हजार सदस्यांच्या नोंदी होणे बाकी असल्याने या योजनेच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. अपुऱ्या नोंदी लवकरात लवकर पुऱ्या करण्याचा आदेश संघटनेने कर्मचाऱ्यांना दिला आहे.    
२०१२च्या वर्षांअखेपर्यंत सर्व सदस्यांना आपल्या भविष्य निर्वाह नीधीच्या खात्यात किती रक्कम जमा झाली, यासंबंधीची माहिती ई-पासबुकद्वारे दर महिन्याला मिळणार होती, परंतु कर्मचाऱ्यांच्या कामाच्या कूर्मगतीमुळे अद्याप नोंदी बाकी आहेत. काही विभागांतील नोंदी पूर्ण झाल्या असल्या तरी अनेक भागांतील नोंदी अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. याबाबत हिंद मजदूर सभेचे सेक्रेटरी ए. डी. नागपाल म्हणाले, सदस्यांच्या खात्यांमधील नोंदी नियमित झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे भविष्य निर्वाह निधी नेट बँक सेवेद्वारे स्टेट बँकेत जमा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.