कर्जाच्या विळख्यात अडकल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रीसला युरोझोनमधून न काढता त्याला नव्याने बेलआऊट पॅकेज देण्यावर युरोपिअन युनियनमधील नेत्यांचे एकमत झाल्याचे ट्विट युरोपिअन युनियनचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सोमवारी केले. आर्थिक अडचणीतून ग्रीसला बाहेर काढण्यासाठी नवे बेलआऊट पॅकेज देण्यावर युरोपिअन युनियनमधील नेत्यांचे एकमत झाले असून, यामध्ये गंभीर आर्थिक सुधारणा आणि आर्थिक मदत या दोन्हींचा समावेश आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती लवकरच देण्यात येणार आहे.
ग्रीसमधील जनतेने युरोझोनमध्ये राहण्याच्या विरोधात मतदान केले होते. युरोपियन देशांचे बेलआऊट पॅकेज ग्रीसमधील जनतेने बहुमताने नाकारले होते. युरोपिअन युनियनने घातलेल्या अटी नाकारून फेरवाटाघाटी करून काही अटी शिथिल करून घेण्यासाठीच त्यावेळी बेलआऊट पॅकेज नाकारण्यात आल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर युरोपिअन युनियनमधील सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांची बैठक ब्रुसेल्समध्ये झाली. त्यात नवे बेलआऊट पॅकेजवर चर्चा करण्यात आली. ज्याला सर्वांनी एकमताने सहमती दर्शविली.