विधानसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी २० कोटींची लाच मागितल्याचा प्रकार ध्वनिफितीच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. कर्नाटकच्या बिजापूर मतदारसंघातून विधासभेच्या उमेदवारीसाठी इच्छूक असणारे विजयगौडा पाटील यांच्याकडून एच.डी.कुमारस्वामी यांनी २० कोटींची मागणी केली होती. या ध्वनिफितीमधील संभाषणात बिजापूरमुधून उमेदवारी मिळवून देण्याच्या मोबदल्यात विजयगौडा यांच्या एका समर्थकाने त्यांच्यासमोर २० कोटी देण्याचा प्रस्ताव मांडल्याचे स्पष्ट झाले आहे. या वर्षातील जून महिन्यात बंगळुरू येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान ३५ मिनिटे चाललेल्या या संभाषणाची ध्वनिफीत शनिवारी प्रसारमाध्यमांच्या हाती लागली. या संभाषणात कुमारस्वामी यांनी पक्षाच्या ४० आमदारांकडून प्रत्येकी १ कोटी रूपये घेतल्याचा उल्लेख केला आहे.