तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात मुस्लिमांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत आणि आयटी कॉरिडॉर उभारण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना चाचपणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यापूर्वी के. चंद्रशेखर यांनी हैदराबादनजीक १० एकर परिसरात आंतरराष्ट्रीय इस्लामिक सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. तसेच अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चारमिनार परिसराचा विकास करण्याचा निर्णयही तेलंगणा सरकारने घेतला होता. त्यानंतर आता सरकारने आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेच्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली.

अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्ती ‘जुम्मा’च्या दिवशी मशिदीत स्फोट करणार नाहीत – शरद पवार

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, अल्पसंख्याकासाठी अशा प्रकारे स्वतंत्र औद्योगिक वसाहत आणि आयटी कॉरिडॉर उभारण्यासंदर्भात कोणतीही ठोस योजना आखण्यात आलेली नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी काही अधिकाऱ्यांना या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्याचे आदेश दिलेत. काल तेलंगणा सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणकारी योजनांविषयी चर्चा झाली. यावेळी के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले की, राज्यातील अल्पसंख्याक समाज गरिबीत जीवन जगत आहे. त्यांना सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचा फायदा मिळायला पाहिजे. त्यामुळेच अल्पसंख्याक समाजासाठीच्या कल्याणकारी योजनांना सरकार नेहमीच प्राधान्य देईल. यादृष्टीने अल्पसंख्याक समाजातील तरूणांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून १ ते २.५ लाखांचे अनुदान देण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. याशिवाय, सरकारकडून बांधण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत अल्पसंख्याकांना १० टक्के आरक्षण देण्यात यावे. तसेच अल्पसंख्याक विकास महामंडळ, उर्दू अकादमी आणि वक्फ बोर्ड यासारख्या संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी पावले उचलण्याची गरजही के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केली.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची शिष्यवृत्ती