बंगळुरूमधील मल्लेश्वरम भागात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाजवळ बुधवारी सकाळी दहशतवाद्यांनी  बॉम्बस्फोट घडवून आणला. हा स्फोट घडविण्यासाठी आयईडीचा वापर करण्यात आल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर. अशोक यांनी स्पष्ट केले.
भाजप कार्यालयाबाहेर असलेल्या दुचाकीवर ही स्फोटके ठेवण्यात आली होती. स्फोटामध्ये १५ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. स्फोटामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांना आणि दुचाकींना आग लागली. बुधवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास हा स्फोट झाला. बंगळुरूमधील अग्निशामक दलाच्या जवानांनी गाड्यांना लागलेली आग तातडीने आटोक्यात आणली. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक घटनास्थळी तपास करीत आहे.