इंटरनेटच्या जादा वापरामुळे लहान मुले वाईट प्रवृत्तींची शिकार होत असल्याची चर्चा सुरू असतानाच सोशल नेटवर्किंगमध्ये अग्रेसर असलेल्या ‘फेसबुक’ने १३ ते १८ वयोगटातील मुलांच्या फेसबुक वापरावरील र्निबध बुधवारपासून हटवले आहेत. यामुळे किशोरवयीन मुलांना आपल्या पोस्ट (मजकूर) कोणाशीही शेअर करता येणार आहे. १८ वर्षांखालील मुलांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ दिल्याचा फेसबुकचा दावा असला तरी या स्वातंत्र्याचा किशोरवयीन मुलांच्या जडणघडणीवर विपरीत परिणामही होऊ शकतो, अशी तज्ज्ञांना भीती आहे.
१३ ते १८ वयोगटातील वापरकर्त्यांना ठरावीक र्निबधांसह फेसबुक वापरण्याची परवानगी होती. आतापर्यंत या वयोगटातील मुला-मुलींना आपल्या पोस्ट्स, व्हीडिओ, छायाचित्रे आपल्या मित्रमैत्रिणी किंवा त्यांचे मित्रमैत्रिणी यांच्याशीच शेअर करता येत होत्या. मात्र, आता हे र्निबध फेसबुकने हटवले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक वेळी पोस्ट टाकताना या मुलांना ‘धोक्याचा इशारा’ देण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.
अल्पवयीन मुलांमध्ये फेसबुकचे आकर्षण वाढलेले आहे. त्यामुळेच मुलांना फेसबुकचा अधिकाधिक आनंद घेता यावा यासाठी र्निबध हटवण्यात आले आहे. अल्पवयीन मुलांना एखादा मुद्दा वा विचार मांडायचे असेल, तर त्यासाठी अधिक प्रभावशाली व्यासपीठ निर्माण होईल, असे फेसबुकने म्हटले आहे.
तज्ज्ञांकडून चिंता
फेसबुकचे हे पाऊल खूप चिंताजनक असल्याचे मत बंगळुरू येथील सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे कार्यकारी संचालक सुनील अब्राहम यांनी व्यक्त केले. लहान मुलांनी शेअर कलेल्या माहितीचा गैरवापर झाल्याची अनेक उदाहरणे जगातच नव्हे तर देशातही आहे. भारत सरकारने याकडे गांभीर्याने पाहून यावर देशात र्निबध लावावेत, असेही ते म्हणाले. तर भारतात सोशल नेटवर्किंग साइटवरील र्निबधांच्याबाबत कोणत्याही प्रकारची बंधने नाहीत. जी काही नियमावली आहे ती मोठय़ा माणसांसाठी आहे यात लहान मुलांचाही विचार करण्याची गरज असल्याचे ‘रीस्पॉन्सिबल नेटिझन’ या चळवळीच्या सभासद सोनाली पाटणकर यांनी स्पष्ट केले.
फेसबुक टीप्स
फेसबुकचे धोरण सध्यातरी बदलणे शक्य नसल्याने याबाबत मुलांनी आणि पालकांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात सोनाली पाटणकर यांनी दिलेल्या काही टीप्स :
*आपले प्रोफाइल अनोळखी व्यक्तींपर्यंत पोहचू नये यासाठी खबरदारी घ्यावी. यासाठी प्रायव्हसी सेटिंग योग्यप्रकारे वापरावीत.
*प्रोफाइल फोटो अपडेट करताना क्लोज अप किंवा हाय रिझोल्यूशनचे फोटो अपलोड करू नयेत. ७२ डीपीआयचे फोटो अपलोड केले म्हणजे ते डाऊनलोड करता येत नाही किंवा मॉर्फिगही करता नाही.
*मोठे फोटो अपलोड करायचे असेल तर वॉटरमार्क करून घ्यावे
*आपली वैयक्तिक माहिती मर्यादितच शेअर करावी.
*फोनमधील कॅमेऱ्याचे जिओ टॅगिंग बंद करावे. म्हणजे जर तुम्ही मोबाइलवरून फोटो शेअरिंग करणार असाल तर तुमचे ठिकाण समजू शकणार नाही.  
*स्वत:चे नाव गुगल सर्च करून पाहा आणि तेथे आपल्याबद्दल किती माहिती दिसते ते पाहा.
*फेसबुक प्रोफाइल ई-मेल आयडी याचे पासवर्ड वेगळे असावेत व ते दर तीन महिन्यांनी बदलावे.
*सायबर कॅफेमध्ये असताना फेसबुकचा वापर केला तर शोल्डर सर्फिग करत नाहीए ना या कडे लक्ष ठेवावे
*अनोळखी व्यक्तींना अॅड करू नका.
*पालकांना आपल्या प्रोफाइलवर अॅड करावे.
*एकाच सोशल नेटवर्किंग साइटवर स्वत:च्या नावाने एकाहून जास्त अकाऊंट असणे हा सायबर गुन्हा होऊ शकतो.
*तुमच्या प्रोफाइलवर कोणत्याही प्रकारचे अनोळखी व्हिडिओ क्लिप दिसले तर ते ओपन करू नका.
*तुमच्याकडे किती मित्र आहेत किंवा किती लाइक्स आहेत यावरून तुमचे सामाजिक स्थान ठरत नसते हे लक्षात ठेवा.
*मुलांना फेसबुकच्या वापराबाबत न ओरडता त्यांच्याशी संवाद साधावा.
*मुलं जर फारच फेसबुकच्या आहारी गेली असतील तर त्यांच्याशी तातडीने संवाद साधावा व त्यांना इतर कामात गुंतवावे.
*तंत्रज्ञानाबद्दल तिरस्कार करण्यापेक्षा ते समजून घेऊन त्याचा वापर चांगल्याप्रकारे कसा करता येऊ शकेल हे मुलांनाही शिकवावे.
*आई-वडिलांनी आयटीच्या कायद्याची माहिती घ्या.