दिल्लीच्या सीमांवर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. हे शेतकरी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवरच रोखलं आहे. दरम्यान, आज दुपारी पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी ड्रोनद्वारे अश्रूधुराचा मारा केला. अश्रूधुराच्या माऱ्यानंतर शंभू सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. आंदोलक शेतकरी सैरावैरा धावू लागले आहेत. तर या सीमेवर अधिक पोलीस फौजफाटा मागवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकऱ्यांनी आज (२१ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता दिल्लीत प्रवेश करण्याची घोषणा केली आणि त्यापाठोपाठ पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स हटवून दिल्लीकडे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकऱ्यांना रोखलं. तब्बल १४ हजार शेतकरी १२०० ट्रॅक्टर्स घेऊन शंभू सीमेवर उभे आहेत. परंतु, पोलीस या शेतकऱ्यांना पुढे सरकू देत नाहीयेत. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी असंच एक आंदोलन केलं होतं. तेव्हा हे शेतकरी अनेक महिने दिल्लीत ठाण मांडून बसले होते. मागच्या वेळी झालेल्या चुका यावेळी होणार नाहीत याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे.

कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत जायचंच अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे दिल्लीच्या सीमांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंजाब-हरियाणा सीमेवर एकूण १४ हजार शेतकरी जमा झाले असून साधारण १२०० ट्रॅक्टर, २०० कार, १० मिनी बसेसच्या माध्यमातून ते राजधानी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. तर बॅरिकेट्सचा अडथळा दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी ज्या वस्तू आणल्या आहेत, त्या जप्त कराव्यात असे आवाहन हरियाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांना केलं आहे.

कृषीमंत्र्यांचं शेतकरी नेत्यांना चर्चेचं आमंत्रण

किमान आधारभूत किमतीसह (एमएसपी) इतर मागण्यांसाठी हजारो शेतकरी दिल्लीकडे मार्गस्थ होणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनीधी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. परंतु, या सर्व फेऱ्या अपयशी ठरल्या आहेत. अशातच केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी आंदोलकांना नवी ऑफर दिली आहे. कृषीमंत्र्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, चार बैठकांनंतर सरकार आता पाचव्या बैठकीत एमएसपीची मागणी, तन (गवत) जाळण्याचा विषय, पिक बदलणे, शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे याबाबत चर्चा करण्यासाठी तयार आहे. तसेच याबाबत चर्चेसाठी मी शेतकरी नेत्यांना आमंत्रित करतो. मला वाटतं की, आपण शांतता राखायला हवी.

हे ही वाचा >> सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी आक्रमक, हजारो शेतकरी दिल्लीत जाण्यासाठी सज्ज!

दरम्यान, शंभू सीमेप्रमाणे सिंघू सीमेवरीवर १४ हजार शेतकरी जमले आहेत. तर धाबी-गुजरन सीमेवर साधारण ४५०० शेतकरी जमा झाले असून त्यांच्याकडे ५०० ट्रॅक्टर्स आहेत. हे शेतकरी दिल्लीला जाण्यासाठी सज्ज आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers protest face tear gas at shambhu border agriculture minister new offer to farmers asc
Show comments