पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. तृणमूल काँग्रेसवर खंडणीचे पैसे वापरल्याचा हीन आरोप मोदींनी केला आहे. त्यांच्या या आरोपाबद्दल त्यांना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. मोदी आणि अमित शाह हे दुर्योधन आणि दुःशासनासारखे आहेत. रावण आहेत असाही आरोप बॅनर्जी यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा बंगालमध्ये आले तेव्हा त्यांनी माझ्यावर खंडणीखोर असल्याचा आरोप केला होता. त्यांना लोकशाहीची एक जोरदार थप्पड मारावीशी वाटते. आमचा पक्ष खंडणीच्या पक्षावर चालत नाही. आमचा पक्ष माझ्या विकल्या जाणाऱ्या चित्रांच्या, पुस्तकांच्या आणि इतर कामांच्या उत्पन्नावर चालतो. आम्ही खंडणीखोर नाही मात्र मोदी आमच्यावर असे खोटे आरोप लावत आहेत.
तृणमूल काँग्रेस हा पक्ष खंडणीवर चालतो असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. ज्याला ममता बॅनर्जी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये एक पोस्टर लावण्यात आले होते. ज्यामध्ये टीएमसी हा पक्ष खंडणीवर चालतो आणि काही गुंड या पक्ष चालवत असल्याची टीका करण्यात आली होती. खंडणीराज आणून ममता बॅनर्जी सरकारने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोपही भाजपातर्फे करण्यात आला. या सगळ्या आरोपांना ममता बॅनर्जी यांनी आज उत्तर दिलं आहे. आता या टीकेला भाजपातर्फे काही उत्तर दिलं जाणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.