आसाममधील काँग्रेसचे आमदार नीलमणी सेंडेका यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे व्यापक पडसाद उमटले आहेत. भाजपने सेंडेका यांच्यावर सडकून टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर इराणी यांच्यासह पंतप्रधानांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेंडेका यांनी इराणी यांना उद्देशून असांसदीय शब्द वापरले, या कमलपूर येथील बेनू धर नाथ नावाच्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून रंगिया पोलिसांनी नीलमणी सेंडेका यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी हे प्रकरण रंगियाच्या उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पाठवले आहे.
भाजप समर्थकांनी सोमवारी रंगिया येथे राष्ट्रीय महामार्गावर आणि तुलसीबारी येथील बाजारात सेंडेका यांच्या प्रतिमा जाळून त्यांचा निषेध केला. आमदार सेंडेका यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
सेंडेका यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपने सोमवारी गुवाहाटीतील ‘राजीव भवन’ या काँग्रेस मुख्यालयासमोर निदर्शने केली. दरम्यान, सेंडेका यांनी केलेले वक्तव्य ही ‘आसामची संस्कृती नाही’, असे सांगून मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध केला आहे.