टाटा मोटर्स व भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांनी हायड्रोजनवर चालणारी बस तयार केली असून तामिळनाडूत महेंद्रगिरी येथे इस्रोच्या लिक्विड प्रापल्शन सिस्टीम सेंटर येथे ती प्रदर्शित करण्यात आली. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर हायड्रोजन घटावर आधारित ही बस तयार करण्यात यश आले आहे. हायड्रोजनच्या ज्वलनातून पाणी तयार होत असल्याने या बसमुळे प्रदूषण होत नाही. ही सीएनजी प्रकारातील बस असून त्यात हायड्रोजन हा अतिशय उच्च दाबाला इंधन घटात भरून  त्या बसच्या टपावर ठेवण्यात आले आहेत.
इस्रोचे मानद सल्लागार व्ही. ग्यान गांधी यांनी या प्रकल्पातील तांत्रिक पथकाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी सांगितले की, या बसमुळो होणारे प्रदूषण शून्य आहे कारण यात इंधनाच्या ज्वलनातून पाणी तयार होते. टाटा मोटर्स व इस्रोच्या वैज्ञानिकांचे हे यश असून त्यात विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषदेचाही मोठा वाटा आहे. बसमध्ये हायड्रोजन हाताळणीसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना यात करण्यात आल्या आहेत. यामुळे मोठय़ा प्रमाणात खनिज तेल वाचणार आहे.
हायड्रोजन तंत्रज्ञान हे आगामी काळात इंधनासाठी महत्त्वाचे असून तो भविष्यातील उर्जास्त्रोत आहे. २०१५ पर्यंत हायड्रोजनवर चालणारी वाहने वापरात आणण्यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत, असे सांगून गांधी म्हणाले की, प्रथम स्तरीय शहरात आगामी काळात खत प्रकल्प व तेल शुद्धीकरण कारखान्यात उपलब्ध हायड्रोजनचा वापर करून बसगाडय़ा चालवल्या जातील.

हायड्रोजन इंधन घट
हायड्रोजन इंधन घट (सेल्स) हे क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचे उपयोजित रूप आहे. हे तंत्रज्ञान इस्रो क्रायोजेनिक इंजिनसाठी विकसित करीत आहे, फक्त यात फरक असा, की येथे द्रव हायड्रोजन वापरला जात नाही. द्रव व वायू रूपातील हायड्रोजन हाताळण्याचे तंत्रज्ञान इस्रोकडे तीन वर्षांपासून उपलब्ध आहे. या सुरक्षित तंत्रज्ञानाचा वापर या बससाठी केला आहे. हायड्रोजन इंधन घटावर आधारित बस तयार करण्यासाठी टाटा मोटर्स व इस्रो यांच्यात २००६ मध्ये करार झाला होता. आता ही बस प्रत्यक्षात आली आहे. या बसमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण शून्य असते.  

डिझेल वापराचे प्रमाण
ट्रक ३७ टक्के बसगाडय़ा १२ टक्के
कृषी पंप १२ टक्के
(आधार- डॉ.किरीट पारेख समिती अहवाल २००८-०९)