‘अंधार असलेल्या किंवा निर्जन रस्त्यावरुन जाताना मला त्याच दिवसाची आठवण येते, बलात्काराच्या बातम्या वाचतानाही मला तोच दिवस आठवतो, मला आता अंधाराचीच भीती वाटते आणि त्या कटू आठवणींनी वेदना होतात…’ पाणावलेल्या डोळ्यांनी निर्भयाची आई तिची व्यथा मांडते..

देशभरात गाजलेल्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेला शनिवारी पाच वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर निर्भयाच्या आईने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना मन मोकळे केले. घटनास्थळावरुन जाताना मला अजूनही असं वाटतं की ती रुग्णालयात आहे, लवकरच ती बरी होऊन घरी येईल. मला लोकं म्हणतात की तुम्ही आता आयुष्यात पुढे जायला हवे. पण मी ही घटना विसरणार नाही आणि लोकांनाही विसरु देणार नाही. ते दुःखच माझे बलस्थान झाले आणि आम्ही लढा दिला, असे त्या सांगतात. डोळे पाणावले असले तरी त्यांच्या बोलण्यातून व्यवस्थेवरील संतापही जाणवतो. निर्भया प्रकरणानंतर अनेक घोषणा झाल्या. मात्र त्या घोषणा फक्त कागदावरच आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम ‘सुरु आहे’, पोलिसांची गस्त वाढवण्याचे काम ‘सुरु आहे’, पण देशात अजूनही महिला व लहान मुलींवर बलात्कार होतच आहेत, मग नेमके काय बदल झाले?, असा सवाल त्या विचारतात. अजूनही दिल्ली असुरक्षितच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ‘पाच वर्षानंतरही अजून निर्भयाला न्याय मिळालेला नाही. माझ्या मुलीवर बलात्कार करणारे आणि त्यानंतर तिची हत्या करणारे नराधम अजूनही जिवंत आहेत, त्यांना कसलीही भीतीच वाटत नाही, न्यायदानात विलंब होतोय, अशी खंत त्या व्यक्त करतात.

‘पाच वर्षांपूर्वी माझ्या मुलीने जिथून बस पकडली, तिथून जाताना मला अजूनही भीतीच वाटते. त्या बसस्टॉपवर एखादी महिला बसची वाट पाहत थांबली असेल तर मलाच भीती वाटते. हे शहर अजूनही असुरक्षितच आहे. दरवर्षी १६ डिसेंबरच्या आठवडाभर आधी आणि त्यानंतर पोलीस गस्त वाढवल्याचा ‘दिखावा’ करतात, त्यानंतर पुन्हा आधीसारखीच परिस्थिती असते, असा आरोप त्यांनी केला. ‘२०१२ पूर्वी महिला बलात्कारासारख्या अत्याचारावर समोर येऊन बोलत नव्हत्या. आता मात्र त्या समोर येऊन आवाज उठवतात, गेल्या पाच वर्षांत झालेला हा एकमेव आणि महत्त्वाचा बदल आहे’, असे त्या सांगतात.