करोनाची लक्षणे असलेल्या पण, जलद प्रतिद्रव नमुना चाचणीचे निष्कर्ष नकारात्मक आलेल्या सर्व संशयित रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी करण्याची महत्त्वाची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सर्व राज्यांना दिली.

दैनंदिन रुग्णवाढ एक लाखाच्या नजिक होऊ लागल्यामुळे झपाटय़ाने होणारी वाढ रोखायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी संशयित रुग्णांचा शोध घेण्यावर भर द्यावा लागत आहे. त्यासाठी एकही संशयित रुग्ण चाचणीतून निसटणार नाही याची खबरदारी घ्यावी लागत असून त्यासाठी राज्यांना फेरचाचणीची सक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) यांनी संयुक्तरित्या पत्र पाठवले आहे.

‘आयसीएमआर’ने राज्यांना दोन नेमक्या सूचना केल्या आहेत. ताप वा खोकला वा श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या व्यक्तींची जलद प्रतिद्रव चाचणी नकारात्मक आली तर त्यांची आरटी-पीसीआर नमुना चाचणी करणे गरजेचे आहे. तसेच, ज्या व्यक्तींमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नसतील आणि त्यांची जलद प्रतिद्रव चाचणी नकारात्मक आली तर दोन वा तीन दिवसांनंतर अशा व्यक्तींमध्ये लक्षणे दिसू लागली तर त्यांचीही आरटी-पीसीआर चाचणी केली पाहिजे, असे स्पष्ट आदेश राज्यांना देण्यात आले आहेत.

आरटी-पीसीआर चाचणीचे निष्कर्षांसाठी एखाद-दोन दिवस लागतात पण, जलद प्रतिद्रव चाचणीचे निष्कर्ष १०-१५ मिनिटांतमध्ये मिळतात तसेच ती तुलनेत स्वस्त आहे. त्यामुळे बहुतांश राज्यांनी आरटी-पीसीआर चाचणीपेक्षा जलद प्रतिद्रव चाचणीवर भर दिला आहे. मात्र, या चाचणीत लक्षण असलेल्या रुग्णांचे नमुने देखील मोठय़ा प्रमाणावर नकारात्मक येऊ लागले आहेत. त्यामुळे संशयित रुग्ण करोनाबाधित असल्याचे निश्चित करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीच करावी लागते. हे लक्षात घेऊन केंद्राने राज्यांना नवे निर्देश दिले आहेत.

दैनंदिन रुग्णवाढ ९५ हजार

दरम्यान, गेल्या चोवीस तासांमध्ये ९५ हजार ७३५ रुग्णवाढ नोंदवली गेली असून एकूण करोना रुग्णांची संख्या ४४ लाख ६५ हजार ८६३ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात ती ९० हजार नजिक होती. ३४ लाख ७१ हजार ७८३ रुग्ण करोनामुक्त झाले असून गेल्या चोवीस तासांमध्ये ७२ हजार ९३९ रुग्ण बरे झाले. ९ लाख १९ हजार १८ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये ११७२ रुग्णांची मृत्यू झाला. मृत्यूचा आकडा ७५ हजार ६२ वर पोहोचला आहे. दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी ४ हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली. बुधवारी व मंगळवारी अनुक्रमे ती ४०३९ व ४६३८ अशी होती. त्यामुळे दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या २ लाखांहून अधिक झाली आहे.