भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महिला केंद्रीय राज्य मंत्री होण्याचा मान मिळविणाऱ्या भावना चिखलीया यांचे शुक्रवारी एका खासगी रुग्णालयात हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. त्या सलग चार वेळा लोकसभेवर निवडून आल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे पक्ष एका समर्पित कार्यकर्त्यांला मुकला असल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.
भावना चिखलीया यांना गुरुवारी सायंकाळी अत्यंत नाजूक परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदय, मुत्रपिंड, श्वसनाचा त्रास होता, आणि त्यातच अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. गुजरातमधून (१९९१) निवडून आलेल्या भाजपच्या त्या पहिल्या महिला खासदार होत्या. अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाजपप्रणीत एनडीए सरकारमध्ये १९९८ ते २००३मध्ये त्या पर्यटन, सांस्कृतिक आणि लोकसभेच्या कामकाज मंत्री होत्या. तसेच त्या १९९९-०२मध्ये रेल्वेच्या विशेष समितीच्या अध्यक्ष होत्या. गेल्या डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणूकीसाठी गठीत करण्यात आलेल्या पक्षाच्या प्रचार समितीत त्यांचा समावेश होता.