पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे संस्थापक कॅप्टन अमरिंदर सिंग आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. सात माजी आमदार आणि एका माजी खासदारासह सिंग भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत सोमवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात पक्षप्रवेश करतील. गेल्या वर्षी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली होती.

“मला अमितभाई शाहांवर विश्वास असून ते मला नक्की न्याय देतील, ते नेहमी…”; पुण्यामध्ये पत्रकारांसमोर सुप्रिया सुळेंचं विधान

मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर लंडनहून परतलेल्या सिंग यांनी गेल्या पंधरवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा, पंजाबमधील अंमली पदार्थांची तस्करी यासह राज्याच्या सर्वांगीण विकासासाठीच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सिंग यांनी म्हटले होते. दरम्यान, लंडनला जाण्यापूर्वी पंजाब लोक काँग्रेसचे विलीनीकरण भाजपामध्ये करण्याचे संकेत सिंग यांनी दिले होते. लंडनहून परतल्यावर पक्षाच्या विलीनीकरणाबाबत सिंग घोषणा करतील, असे पंजाबमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते हरजीत सिंग गरेवाल म्हणाले होते. त्यानंतर सोमवारी पक्षाच्या बैठकीनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात प्रवेश करणार आहेत. दोनदा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले सिंग हे पतियाळा राजघराण्याचे वंशज आहेत.

गुजरातमध्ये पराभवाच्या भीतीने ‘आप’विरोधात भाजपची दडपशाही;माध्यमांच्या मालकांना धमकावण्यात आल्याचा केजरीवाल यांचा आरोप

फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब विधानसभेतील एकूण ११७ जागांपैकी ९२ जागांवर बाजी मारत आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला केवळ १८ जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी लढवलेल्या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत पंजाब लोक काँग्रेसने भाजपा आणि शिरोमणी अकाली दलासोबत (संयुक्त) युती केली होती. या निवडणुकीत या युतीला एकही जागा जिंकता आली नाही. पतियाळामध्ये अमरिंदर सिंग यांचा आपच्या उमेदवाराने १९ हजार ८७३ मतांनी पराभव केला होता.